विद्यार्थी-युवकांच्या संदर्भात करिअर नियोजनाचे महत्त्व प्रामुख्याने दोन टप्प्यांवर असते. त्यातील एक म्हणजे सुरुवातीला कुठल्या विषयात वा क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण घ्यावे हा टप्पा. त्यानंतर साधारणत: निवडलेल्या विषयात पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर कुठल्या स्वरुपात रोजगार वा नोकरी सुरू करावी हा करिअरच्या संदर्भात वरील दोन्ही टप्पे महत्त्वाचे असतातच. मात्र त्याहून अधिक महत्त्वाचा व दूरगामी स्वरुपाचा मुद्दा असतो तो रोजगाराची सुरुवात केल्यानंतर नोकरी रोजगारात अधिकाधिक प्रगती साधण्यासाठी आवश्यक असणारे बदल, तयारी व त्याच्या विचारपूर्वक नियोजनाचे.
व्यक्तीगत स्वरुपात व वैयक्तिक स्तरावर वरील तिन्ही टप्पे महत्त्वपूर्ण असले तरी त्यामध्ये वैचारिक वा व्यवहारिक स्वरुपात काही महत्त्वाचे व मुलभूत स्वरुपातील फरक असतात हे पाहणे महत्त्वाचे ठरते. उदा.सुरुवातीचे शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षण अभ्यासक्रमाच्या संदर्भात आपला विचार निर्णय करण्यापूर्वी विद्यार्थी स्वाभाविकपणे आपल्या पालकांचा, वडीलधाऱ्यांचा सल्ला घेतात. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी-रोजगाराची सुरुवात करताना अथवा त्यानंतर आपल्या नोकरी रोजगारामध्ये बदल करताना अधिकतर तरुण उमेदवार आपले निर्णय, आपली इच्छा-आकांक्षा, भविष्याबद्दलच्या कल्पना यावर आधारित व मुख्य म्हणजे स्वत:च्या इच्छेनुरुप घेत असतात. प्रसंगी त्यासाठी आवश्यक अशी जोखीम पण ते स्वीकारतात, असे असले तरी त्यासाठी नोकरीतील करिअरचे नियोजन आवश्यक असतेच.
शिक्षण पूर्ण झालेल्या अगदी पहिल्या टप्प्यात म्हणजेच पदवी-पदव्युत्तर असणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांमध्ये वेगळी इच्छा-आकांक्षा असते. मोठी स्वप्ने असतात. त्यांच्यामध्ये नवे व मोठे काही करण्याचा आत्मविश्वास असतो. मात्र त्याचवेळी त्यांना मोठ्या स्पर्धेसह आव्हानांना तोंड द्यावे लागते. स्पर्धेत केवळ टिकाव धरणेच पुरेसे नसते तर स्पर्धेमध्ये इतर अनेकांना मात देत आपले अव्वलपण सिद्ध करावे लागते. हे करणे शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या पलीकडचे असते. अशावेळी संबंधित विद्यार्थ्यांची इच्छा व प्रयत्नांना त्यांचे पालक, मार्गदर्शक वा सल्लागार यांची वेळेत साथ मिळणे विशेष परिणामकारक ठरते.
शैक्षणिक अभ्यासक्रमाचा मुलभूत व मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विविध विषयांची माहिती व ज्ञान देणे हा असतो. यामुळे विविध स्तरांवरील विद्यार्थ्यांना विविध प्रकारची व वेगवेगळ्या स्वरुपाची माहिती मिळते. यातून त्यांच्या मुलभूत ज्ञान आणि शैक्षणिक दर्जामध्ये भर पडत जाते. मात्र याचा अर्थ ठराविक अभ्यासक्रम पूर्ण करून विशिष्ट शैक्षणिक दर्जा प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना विशेष कामकाज वा रोजगारासाठी आवश्यक पात्रता मिळतेच असे नाही.
शिक्षण आणि रोजगार यातील महत्त्वाचा फरक म्हणजे शिक्षण ही विशिष्ट विषय क्षेत्रातील रोजगाराची पूर्व पायरी असते. केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम वा पात्रतेमुळे संबंधित विद्यार्थी वा उमेदवार रोजगार क्षमतेला पात्र होत नाही. यातूनच शिक्षणानंतर व विशिष्ट शैक्षणिक पात्रतेच्या आधारे प्रत्यक्ष कामाची जबाबदारी देण्यापूर्वी बरेच ठिकाणी उमेदवारांना प्रशिक्षणार्थी अथवा शिकावू उमेदवार म्हणून नेमण्यात येते. यातून नव्याने शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा सराव व कामाशी निगडित मुद्दे शिकता येतात. परिणामी त्यांची रोजगार क्षमता व पात्रता वाढते व त्याचा फायदा त्यांना भविष्यात होतो.
उमेदवारांनी आपल्या नोकरी-रोजगाराला सुरुवात केल्यावर त्यांना शैक्षणिक पात्रतेसह प्राप्त केलेल्या ज्ञानाला कामासंबंधीच्या कौशल्यासह काही बाबी नव्याने व परिणामकारकरित्या शिकण्याची आवश्यकता असते. यापैकी अधिकतर बाबी या परस्पर संबंधांवर मानवीय पैलूंशी निगडित असतात हे विशेष. कामाच्या ठिकाणाचे परस्पर संबंध, संवाद, सहकार्य, समन्वय नेतृत्वक्षमता इ. चा याठिकाणी प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. विद्यार्थी म्हणून शैक्षणिक पात्रता व कर्मचारी म्हणून आवश्यक गुणवत्ता यासंदर्भात या बाबी महत्त्वाच्या ठरतात.
शैक्षणिक पात्रताधारक विद्यार्थी आपली शैक्षणिक पात्रता व शिक्षण याआधारे रोजगार, करिअरची सुरुवात तर करू शकतात. मात्र त्यांना कामाच्या ठिकाणी यशस्वी व प्रभावशाली होण्यासाठी त्यांच्या ज्ञानाला कौशल्य आणि मानसिकतेची सकारात्मक जोड लाभणे अनिवार्य ठरते. या तीन गुणांचा समन्वय झाल्यास रोजगार-करिअरमध्ये यश लाभणे सहजसाध्य होते. यालाच जे उमेदवार कर्मचारी म्हणून मूल्यांवर आधारित कामकाजाची जोड देतात त्यांची प्रगती आवश्यक होते.
प्रत्यक्षात नोकरीला सुरुवात केल्यावर अधिकांश उमेदवार, कर्मचाऱ्यांमध्ये काम आणि कामकाज या दोन्हीच्या संदर्भात आवडी-निवडी व प्राधान्य नाराजी हे मुद्दे स्वाभाविकपणे अनुभवास येतात. सुरुवातीच्या टप्प्यात असे अनुभव ही एक स्वाभाविक बाब ठरते. या टप्प्यात नव्याने करिअर सुरू करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रामुख्याने करिअरची सुरुवातीची कंपनी, तेथील कामकाज, स्वत:च्या कामाचे स्वरुप, सहकारी व वरिष्ठांशी संबंध, पुढे शिकण्याला वाव, सुरुवातीला मिळणारा पगार व इतर फायदे यावर नव्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्तरावरील आवड निवड ठरते. या मुद्यांवरच नव्याने नोकरी करिअर सुरू करणाऱ्यांचा नोकरी संदर्भातील कल वा कंपनीच्या संदर्भातील आवड-निवड स्पष्ट होते.नव्या कर्मचाऱ्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या या टप्प्यातील या सर्वसाधारण मानसिकतेच्या संदर्भात विशेष महत्त्वाची बाब ठरते. ती त्यांच्या करिअर विषयक इच्छा आकांक्षांची यालाच सध्या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांच्या व्यवस्थापनाची, अभ्यास व अभ्यासक्रम पूर्ण करणारे उमेदवार त्यांच्या करिअर विषयक इच्छा-अपेक्षांसह आपले करिअर म्हणून पहिल्या रोजगाराची निवड करतात. आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात वेगाने करिअर क्षेत्रात प्रगती करण्याची त्यांची इच्छा असते. या आकांक्षांना मूर्त रुप देण्यासाठी तेवढीच आवश्यकता ते नियोजनबद्ध व परिश्रमांसह प्रयत्न करण्याची. यासाठी बऱ्याचदा काही काळ द्यावा लागतो. कालबद्ध स्वरुपात प्रयत्न करावे लागतात. याचे भान जे उमेदवार करिअरच्या सुरुवातीला ठेवतात त्यांना त्याचे मोठे व दीर्घकालीन लाभ मिळू शकतात, हे लक्षात घ्यायला हवे.
नोकरी, रोजगारातून आपले करिअर घडविण्याच्या निर्णय घेण्यापासून त्यामध्ये प्रगती साधणे, स्पर्धेवर मात करणे ही सारी महत्त्वाची कामे आपली आपल्यालाच करावी लागतात. यासाठी आपल्या प्रयत्नांना इच्छाशक्ती, सातत्य, प्रयत्नशीलता, परिश्रमी कल्पकता इ. जोड देणे संबंधित व्यक्तीवरच मुख्यत: अवलंबून असते. कर्मचारी म्हणून आपले करिअर यशस्वीपणे करून आपल्या अपेक्षेनुरुप कारकीर्द पूर्ण करणाऱ्यांच्या संदर्भात वरील बाबी प्रामुख्याने दिसून येतात. करिअरमध्ये कमी कालावधीत शीघ्र पद्धतीने प्रगती पदोन्नती साधण्यासाठी बऱ्याचदा नोकरीमध्ये बदल करावे लागतात. याचे फायदेसुद्धा बऱ्याचदा दिसून येतात. नवी कंपनी कार्यालय इ. मुळे नव्या अनुभवांसह शिकण्याचा फायदा होतो. मात्र बऱ्याच कर्मचाऱ्यांचा कल हा वारंवार नोकरीत बदल करण्याकडे असतो. या कर्मचाऱ्यांना पद प्रतिष्ठा वा पगारवाढीसाठी होत असला तरी नोकरीतील हे बदल विचारपूर्वक व्हायला हवेत.
दत्तात्रय आंबुलकर