हवामान बदलाची तीव्रता दरवर्षी वाढताना दिसते आहे. यंदाचा पावसाळा त्याचे उत्तम उदाहरण ठरावे. जम्मू काश्मीरमधील किश्तवाड भागांत अक्षरश: ढग कोसळले आहेत. अतिवृष्टीच्या तीव्रतेत खूपच वाढ दिसून आल्याने जीवितहानी बरोबरच मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. . यंदाच्या वर्षात अनेक घटनांमधून येऊ घातलेल्या हवामान बदलांच्या आपत्तींची झलकच पाहायला मिळाली आहे. काश्मीरमधील प्रसिद्ध गुलमर्ग या पर्यटन स्थळाला गेल्या हंगामात बर्फवृष्टीच झाली नाही. त्याशिवाय पावसाने अतिलहरीपणा दाखवला आहे. हिमाचल प्रदेशात दरडी कोसळण्याचे प्रमाण खूपच वाढले. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर आणि सिक्कीम या राज्यात 800दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच मिझोराममध्ये 400 दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
पावसाच्या लहरीपणाचा फटका गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, ओडिसा, उत्तराखंड, हिमाचल, महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश या राज्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. या राज्यांमधील 80 टक्के जिल्हे 2030 सालापर्यंत तीव्र दुष्काळ आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस अनुभवतील असे संशोधनाअंती समोर आले आहे. यंदाच्या पावसाळ्याने मुंबई महानगराचे कोलमडणे म्हणजे सरकारच्या विकासकल्पनांच्या दारिद्र्याचे समर्पक लक्षण आहे. उत्तरेकडील राज्यात यंदा ढगफुटीने कळसच गाठला आहे तर महाराष्ट्रसारखे राज्य नेहमीच्या पावसाच्या बरसातीने घायकुतीला आले आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजपेक्षाही जगात अधिक तीव्र वेगाने हवामान बदल होऊ लागले आहेत.
समुद्राची पाण्याची पातळी खूपच वेगाने वाढू लागली आहे. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा यांची तीव्रता कैकपटीने वाढली आहे. यामुळे कामगारांच्या उत्पादकतेत लक्षणीय घट दिसून आली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम’ या जागतिक अहवालानुसार येत्या चार दशकात भारताच्या जीडीपीला किमान 25 टक्के इतका फटका बसणार आहे. भारताबरोबरच बांगलादेश 30.5 टक्के, व्हिएतनाम 30.2 टक्के इंडोनेशिया 26.8 टक्के इतका या देशांच्या जीडीपीला फटका बसणार आहे. सध्याच्या गतीने हवामान बदल होत राहिल्यास देशातील 30 कोटी लोकांना याचा तीव्र फटका बसेल. गरीब लोक या हवामान बदलात अधिक भरडले जाणार आहेत. समुद्र पातळी वाढत जाऊन किनारपट्टीजवळील जीवन धोक्यात येईल. हवामान बदलामुळे हिमवादळे, सौरवादळे वाढली आहेत. तसेच तापमानात 4 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. ढगफुटी पाऊस, अवकाळी पाऊस यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. वादळे आणि पूर यामुळे 70 टक्के नुकसान वाढले आहे. अंटार्टिका येथील हिमपर्वत वेगाने वितळू लागल्याने समुद्र पातळी वेगाने वाढू लागली आहे.
हवामानावर अवलंबून असणाऱ्या शेती, मच्छिमारी आणि वनीकरण या क्षेत्रांना गेली कांही वर्षे सातत्याने मोठा फटका बसला आहे. यासाठी चीन आणि अमेरिकेने हवामान बदल संशोधन आणि विकास यावर गुंतवणूक वाढवली आहे. जर याकडे दुर्लक्ष केले तर 102 बिलियन डॉलर ते 430 बिलियन डॉलर असा फटका बसू शकतो. वेळीच खबरदारीचा उपाय केला गेला तरच नुकसान टाळता येईल. आपल्याकडे हवामान बदल आणि होणारे नुकसान याबद्दलचे संशोधन दारिद्र्या प्रचंड आहे. नुकसान झाले की अनुदान द्या नाहीतर कर्जमाफी करा या पलीकडे शासनाचीही मजल जात नाही. जगातील भारत, चीन, नायजेरिया आणि बांगलादेश व पाकिस्तान या पाच देशांना तीव्र उन्हाळ्याचा सामना करावा लागेल. यामध्ये उष्णतेच्या लाटा तसेच दुष्काळाची तीव्रताही वाढेल असा अंदाज आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली, सुरत, हैद्राबाद, पटना, भुवनेश्वर या शहरांना अतिपावसाचा, तीव्र उन्हाळ्याचा फटका बसण्याचे प्रमाण दुपटीने वाढण्याचा अंदाज आहे. टियर 1 आणि टियर 2 या कक्षेत येणारी 72टक्के शहरे हवामान बदलाच्या परिणामांना सामोरी जातील.
मुळातच हवामान केंद्रे खूप कमी आहेत. दरवर्षीच्या हवामान नोंदी अचूकतेने नोंदवून त्याच्यावर संशोधनात्मक विश्लेषण केले जाणे गरजेचे आहे. आपत्ती व्यवस्थापनच्या पद्धतीत आमूलाग्र बदल अपेक्षित आहे. मुख्यत्वेकरून सागर किनारी भाग तसेच पर्वतीय भाग येथील पूर्वानुमानावर अचूकता येण्याच्या दृष्टीने काम होणे आवश्यक आहे. तसेच सहा प्रमुख क्षेत्रे म्हणजे ऊर्जा, उद्योग, वाहतूक, उत्पादन, बांधणी क्षेत्र आणि जंगले येथून होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यावर भर द्यायला हवा. ऊर्जा वापराची आणि ऊर्जा उपकरणांची कार्यक्षमता वाढवायला हवी. शेती या प्रमुख क्षेत्राचे दरवर्षी हवामान बदलांमुळे खूप नुकसान झाल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्याला मार्गदर्शन करणारी पूर्वानुमानची पद्धत विकसित करण्याचे आव्हान समोर उभे ठाकले आहे. यावर काम करा आणि प्रभावी उपाय शोधा हाच तर ‘हवामान बदलांचा’ सांगावा आहे.
-प्रा.डॉ. गिरीश नाईक








