ग्रामसभेत ठराव : पाणी प्रश्नावर जोरदार चर्चा : विहीर खोदकामावरून गदारोळ : विविध विषयांवर चर्चा
प्रतिनिधी /पेडणे
हेरवाड गावातील शोरोळ तालुक्मयातील आणि कोल्हापूर जिह्यातील पंचायतीने विधवा प्रथेच्या विरोधात ठराव मंजूर केल्यानंतर हा विषय पूर्ण देशभर चर्चेला आला होता. त्याचाच एक भाग म्हणून कोरगाव ग्रामसभेत विधवा प्रथेविरोधात ठराव मंजूर केला. माजी सरपंच तथा पंच सदस्य स्वाती गवंडी यांनी हा ठराव मांडला तर विनिता मांदेकर यांनी अनुमोदन दिले.
विधवा महिलांना सन्मान मिळावा पतीच्या निधनानंतर महिलांना विधवा म्हणून हिणवू नये, यासाठी गैरप्रथा बंद करण्याबाबत स्वाती गवंडी यांनी याविषयी ग्रामसभेत माहिती दिली. पत्रकार प्रकाश तळवणेकर यांनी हा महिलांचा विषय आहे, तो महिलांनी सामोपचाराने सोडवावा, अशी सूचना करून कोरगाव गावात अशी विधवेला हिंणवण्याची प्रथा नसल्याचा दावा केला. माजी सरपंच सुदिप कोरगावकर हनुमंत शेटगावकर विनिता मांदेकर स्मिता नारोजी आदींनी चर्चेत भाग घेतला.
कोरगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा 29 रोजी सरपंच उमा साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री कमळेश्वर सभागृहात झाली. यावेळी पंच अब्दुल नाईक कुस्तान कोयेलो, सदस्य स्वाती गवंडी, प्रमिला देसाई, वसंत देसाई, माधव पालयेकर, मुकुंद जाधव, समील भाटलेकर आदी पंच मंडळी उपस्थित होती.
सुरुवातीला पंचायत सचिव कोरगावकर यांनी मागच्या सभेचा वृत्तांत वाचून कायम करण्यात आला. मागच्या सभेत मांडण्यात आलेल्या ठरावांची कोणत्या प्रकारे कार्यवाही केली जाते, अशी विचारणा ग्रामस्थांनी केली. सरपंच उमा साळगावकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
मेगा प्रकल्पाला विरोध
कोरगाव पंचायत क्षेत्रात माईण येथील कोणत्याही मेगा प्रकल्पाला प्रकल्पाला मान्यता देऊ नये, अशी मागणी केली. तसेच माईण येथील मेगा प्रकल्पाला दिलेला ना हरकत दाखल मागे घेण्याचा ठराव मांडला. त्यावर बरीच चर्चा झाली. टीसीपीने मंजुरी देऊनही आता विरोध होत असेल तर कोरगाव पंचायत क्षेत्रात जे जे विदेशी पर्यटकांना भाडय़ाने ठेवून व्यवसाय करतात त्यांच्यावरही बंदी घालावी आणि कोणकोणते नागरिक आपापल्या घरात विदेशी पर्यटकांना ठेवतात आणि त्यांच्याकडून पंचायत कोणत्या प्रकारचा महसूल गोळा करते. याविषयी माहिती द्यावी, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. शिवाय मेगा प्रकल्पासंबंधी जर प्रकल्पासाठी कायदेशीर प्रक्रिया केली तर त्याला विरोध कोणत्या पद्धतीने केला जाईल, यावर काही ग्रामस्थानी सांगितले.
ग्रामसभेच्या मान्यतेशिवाय प्रकल्पांना परवानगी नको!
स्थानिक जर प्रकल्प उभारत असेल तर आमचा विरोध नसेल मात्र बिगर गोमंतकीय असे मोठमोठे प्रकल्प उभारून गावात पाणी वीजपुरवठा व कचऱयाची समस्या निर्माण होते. या समस्येवर कोणता तोडगा काढण्यात आला, असा सवाल नरेश कोरगावकर, सुदीप कोरगावकर यांनी केला. या प्रश्नाला सरपंच किंवा पंचायत मंडळाकडून समर्पक उत्तरे न मिळाल्याने किमान याच विषयावर दोन तास चर्चा झाली. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. प्रकल्पाची कागदपत्रे पंचायतीत सादर करावी, यापुढे कोरगाव पंचायत क्षेत्रात कसल्याच प्रकारच्या मेगा प्रकल्पाला ग्रामसभेची मान्यता घेतल्याशिवाय परवानगी देऊ नये, असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
पाणी प्रश्नावरून प्रश्न-प्रतिप्रश्न
पाण्याचा विषय बराच गाजला. पाणी पेटते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. अनेक महिलांनी पुरुष आणि पाण्याच्या विषयावर गरमागरम चर्चा केली. पंधरा-पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही. किंवा टँकरद्वारे पाणीपुरवठा पंचायत मंडळ का करू शकत नाही. असा प्रश्न ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित केला. यावर सरपंच उमा साळगावकर म्हणाल्या, आपण सार्वजनिक बांधकाम विभाग पेडणे आणि स्थानिक आमदार प्रविण आर्लेकर यांच्या कानावर ही गोष्ट घातली, असे स्पष्टीकरण दिले. याप्रश्नी पंचायत मंडळ स्थानिक आमदारांकडे का गेले नाही? असा प्रतीसवाल ग्रामस्थांनी केला असता याला योग्य ते उत्तर मिळाले नाही.
कोनाडी विहीर खोदकामावर जोरदार चर्चा
कोनाडी येथील विहिरीचा प्रश्न बराच गाजला. यावर दोन गटांत बरीच चर्चा होऊन गदारोळ माजला. आरोप प्रत्यारोप करत दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. यावेळी सरपंचाना धारेवर धरले.
क्रीडा मैदानाचा पंचायतीकडे आराखडा आहे की नाही अशी विचारणा यावेळी ग्रामस्थांनी केली. पेडणे मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले प्रवीण आर्लेकर यांचे अभिनंदन करणारा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी परशुराम गावडे, नरेश कोरगावकर, सुदीप कोरगावकर, महादेव गवंडी, उल्हास देसाई, रजनीकांत गावडे, विनिता मांदेकर, स्मिता नारोजी, लक्ष्मण गावडे, आग्नेल त्रिनाद, देवानंद गावडे आदींनी चर्चेत भाग घेतला.









