कुडचडे शौर्यसभेत टायगर राजा सिंह यांचे आवाहन : दहा हजारांची उपस्थिती, शौर्ययात्रेलाही प्रचंड प्रतिसाद
कुडचडे : आज सांगण्यास दु:ख वाटते की, आम्ही असेच हातावर हात धरून बसलो, तर दहा वर्षांनी आपल्याला अशी शौर्यसभा भरविण्यास मिळणार नाही. हिंदूधर्मियांच्या कोणत्याच दलाचे शक्तिप्रदर्शन करण्यास मिळणार नाही. त्यामुळे आम्हा सर्वांनी एकत्र राहणे भरपूर गरजेचे आहे. त्यामुळे बांगलादेशीवाल्यांना चापलुसी करण्यास जागा मिळणार नाही, असे उद्गार टायगर राजा सिंह यांनी रविवारी सायंकाळी कुडचडेत आयोजिण्यात आलेल्या शौर्यसभेत बोलताना काढले. बजरंग दल कोणाचे वाईट करत नाही, तर सांगितलेल्या शिस्तीचे पालन करते.
आपण येथे एक शपथ घेऊया की, कसेही करून हिंदुत्व वाचवुया व भारताला हिंदुराष्ट्र बनवुया, असे आवाहन त्यांनी पुढे केले. विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल यांच्यातर्फे गीताजयंतीनिमित्त रविवारी सावर्डे येथून आयोजित केलेल्या शौर्ययात्रेला व संध्याकाळी कुडचडे-काकोडा नगरपालिकेच्या खुल्या मैदानावर आयोजित केलेल्या विशाल शौर्यसभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शौर्यसभेला अंदाजे 10 हजार लोक उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रखर हिंदुत्ववादी नेते टायगर राजा सिंह बोलत होते. त्याशिवाय गोवा संघ प्रमुख मोहन आमशेकर, अभय प्रभू, राजेंद्र पवार, बजरंग दलाचे संकेत आर्सेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
गोव्यातील हिंदू एकता आदर्शवत
गीताजयंतीच्या निमित्ताने बजरंग दलाने घडवून आणलेला हा कार्यक्रम अविस्मरणीय आहे. त्याबद्दल मी गोवा बजरंग दलाच्या प्रत्येक सदस्याचे अभिनंदन करतो. गोव्यात हिंदूधर्मियांमध्ये जी एकता दिसून आली आहे त्याचा आदर्श भारतातील इतर राज्यांनी घेण्यासारखा आहे, असे मत टायगर राजा सिंह यांनी पुढे बोलताना व्यक्त केले. आपल्या देशातील कित्येकांना डिसेंबर महिन्यात गीताजयंती असते हे माहीतही नसते. तसेच त्यांच्या पालकांनीही माहिती नसते. आपल्या देशात अशी काही कुटुंबे आहेत ज्यांना रामायण, भगवद्गीतासारखे ग्रंथ बघण्यास सुद्धा मिळत नाहीत. हे दुर्भाग्य आहे, असे ते म्हणाले.
गीता पुढच्या पिढीला समजणार कशी ?
काही देशांमध्ये हायस्कुलांत कुराण शिकविणे अनिवार्य आहे. पण आपल्या भारत देशात कोणत्याच विद्यालयात किंवा महाविद्यालयात गीता शिकवली जात नाही. जर कोणी ती शिकविण्याचे धाडस केले, तर त्याला हिंदूबांधवांकडूनच विरोध करण्यात येतो. हे बांधव इतर धर्मांतील लोकांच्या सांगण्यावर जास्त विश्वास ठेवतात. आपल्या आजच्याच पिढीला भगवद्गीतेबद्दल माहिती नसेल, तर पुढच्या पिढीला ती माहिती कशी समजणार व त्यांना ती कोण समजावणार, असा सवाल टायगर राजा सिंह यांनी केला.
गोमंतकीय हिंदूधर्मियांनी सतर्क व्हावे
आज देशात बोलले जाते की, हिंदूंची भारतातील संख्या 100 कोटी आहे. पण ती कोणत्या प्रांतांत आहे हे कोणालाच माहीत नाही अशी परिस्थिती आहे. कारण जे नाही ते माहीत कसे असणार. गोव्यात याअगोदर मुस्लिमधर्मियांची लोकसंख्या 3 टक्के होती, ती आता 12 टक्क्यांवर पोहोचली आहे. यावर हिंदूधर्मियांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कारण ज्या ठिकाणी हिंदूंची संख्या कमी होते तेथे त्यांच्यावर अत्याचार करण्यास सुऊवात होते. आपण जर असेच आरामात बसून राहिलो, तर गोव्यातील हिंदूधर्मियांवरही अशी परिस्थिती यायला वेळ लागणार नाही. आज जर प्रत्येक हिंदूने विचार केला नाही, तर पुढे कपाळाला टिळा वा कुंकू लावण्याअगोदर दहा वेळा विचार करावा लागेल आणि गोव्यातही तशी स्थिती येईल, असा इशारा टायगर राजा सिंह यांनी दिला.
तेव्हा महाराज होते, आता बजरंग दल आहे
सर्वांना माहिती आहे की, गोवा हा सुसंस्कृत प्रदेश आहे. ज्यावेळेस येथे पोर्तुगीजांनी धर्मांतर करण्यास सुऊवात केली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी येऊन त्यांचा काटा काढला व ते सत्र थांबविले हा इतिहास आहे. तेव्हा महाराज होते आणि आता बजरंग दल आहे. आज गोव्यात कोणाची गाय कत्तलखान्यात जात असेल, तर त्या गायीचा मालक तिला वाचविण्यासाठी आशेने पोलिसांकडे नव्हे, तर बजरंग दलाकडे पाहतो. ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांच्या बाबतीतही स्थिती अशीच आहे, असे ते पुढे म्हणाले.
मुलांना बजरंग दलाच्या शाखांत पाठवा
आज सर्व हिंदूधर्मियांनी आपल्या घरात शस्त्र हे ठेवलेच पाहिजे. ते शस्त्र आपल्या रक्षणासाठी ठेवायचे आहे. पुढच्या पिढीने स्वतंत्र हिंदू म्हणून जगावे असे वाटत असेल, तर त्यांना आपापल्या गावातील बजरंग दलाच्या शाखेत दाखल करा. ती मुले जेव्हा शाखांमध्ये जातील तेव्हाच त्याचे महत्त्व समजणार, असे आवाहन टायगर राजा सिंह यांनी केले.
बजरंग दलाकडून देश जोडण्याचे काम
गीताजयंतीनिमित्त आयोजित केलेला हा उपक्रम महत्त्वाचा आहे. 1984 साली राम-जानकी यात्रा काढली होती. तेव्हापासून असे उपक्रम सुरू आहेत. सेवा, सुरक्षा व संस्कार यावर बजरंग दल आधारित आहे. बजरंग दल भारत जोडत आहे, पण या देशात काही लोकांकडून भारत तोडण्याचे काम चालू आहे. मात्र बजरंग दल आपले कार्य करायला मागे-पुढे बघत नाही, असे उद्गार राजेंद्र पवार यांनी काढले.
प्रत्येक गावात बजरंग दल हवे
6 डिसेंबर, 1992 रोजी जे कार्य बजरंग दलाने केले ते कौतुकास्पद होते आणि त्या क्षणाचा साक्षीदार म्हणून मला अभिमान आहे. यापुढे प्रत्येक हिंदूच्या घरात शस्त्र असलेच पाहिजे. प्रत्येक गावात बजरंग दल स्थापित व्हायला हवे, असे विश्व हिंदू परिषदेचे गोवा विभाग मंत्री मोहन आमशेकर म्हणाले. दुर्गा वाहिनी प्रत्येक गावात असणे गरजेचे आहे. तेव्हाच ‘लव्ह जिहाद’सारख्या प्रकारांना सामोरे जावे लागणार नाही, असे उद्गार संकेत आर्सेकर यांनी काढले विराज देसाई यांनी बजरंग दलाच्या कार्याबद्दल माहिती दिली. बजरंग दल हे आमच्या आई-भगिनींवर कधीच संकट येऊ देणार नाही. येथे लाभलेली प्रचंड उपस्थिती हे हिंदूंचे सामर्थ्य आहे, असे ते पुढे म्हणाले. विशाल प्रभू यांनी आभार मानले. यावेळी अत्रेजी भिडे यांच्या ओंकार नादाने तसेच ढोल-ताशांच्या गजराने पूर्ण कुडचडे शहर दुमदुमून गेले. सावर्डे येथील मनोहर पर्रीकर मैदानावर बजरंग दलाच्या सदस्यांनी ध्वजारोहण करून उत्साहात शौर्ययात्रेला सुऊवात केली. बजरंग दलाचे अडीच हजारांहून जास्त सदस्य या यात्रेत सहभागी झाले होते तसेच अन्य हिंदूधर्मियांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.









