सण-उत्सवादरम्यान होणारे प्रदूषण रोखण्याबाबत बेळगावकर उदासीन : जनजागृती करण्याची नितांत गरज
प्रतिनिधी /बेळगाव
संस्कृती आणि विविध सणांची परंपरा जपण्यामध्ये बेळगाववासीय आघाडीवर आहेत. मात्र सण आणि उत्सव यादरम्यान होणारे प्रदूषण रोखण्याबाबत मात्र बेळगावकर काहीसे उदासीन आहेत. तसेच प्रदूषण रोखण्याबाबत जनतेचे आणि विविध संघटनांचे प्रबोधन करण्यात प्रदूषण नियत्रंण मंडळ पुरेसे प्रयत्न करत असल्याचे दिसून येत नाही. श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी केवळ फिरत्या वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यापलिकडेही जनजागृती करण्याची नितांत गरज आहे.
पर्यावरण स्वच्छ तर आरोग्य सुंदर असे समीकरण आहे. यामुळे गणेशोत्सव साजरा करताना प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची गरज आहे. गणेशोत्सवात दीड दिवस ते अकरा दिवस गणरायाचे पूजन करून पावित्र्य जपले जाते. पण अकरा दिवस जपलेले पावित्र्य शेवटच्या दिवशी क्षणार्धात नष्ट होते. कारण विसर्जन करताचे दृष्य पाहिले की सर्वांच्या मनात ही बाब खटकते. शहरातील विविध तलावांमध्ये व विहिरीमध्ये गणपतीबाप्पांचे विसर्जन केले जाते. तसेच निर्माल्याचे विसर्जन केले जाते. पण विसर्जन करताना पावित्र्य आणि पर्यावरणाचा विचार केला जात नाही.
सण साजरे करताना मोठय़ा प्रमाणात प्रदूषण
सण साजरा करताना वास्तविक पाहता ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण मोठय़ा प्रमाणात होत असते. यामुळे उत्तम आरोग्याची मागणी करीत असताना आपणच पर्यावरणाचा नाश करतो. याचा विसर प्रत्येकाला पडतो. विसर्जनावेळी मिरवणूक काढताना डॉल्बी लावण्याची परंपरा वाढीस लागली आहे. तसेच फटाके वाजविण्यात येतात. यामुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण आणि जलप्रदूषण मोठय़ा प्रमाणात होत असते.
शहरात 400 हून आधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि हजारो घरगुती गणेशमूर्तींचे पूजन करण्यात येते. यासर्व मूर्तीचे विसर्जन विहिरी, तलाव आणि नदीमध्ये केले जाते. परिणामी जल प्रदूषण होण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडे अकरा ते पंधरा फूट उंचीच्या श्री गणेशमूर्ती बनविण्याकडे कल वाढला आहे. पण याकरिता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनविण्यात येत आहेत. मोठय़ा उंचीच्या श्रीमूर्तीचे विसर्जन करताना विटंबना होते.
2 टन निर्माल्य
गणेशोत्सव काळात दररोज दोन टनांहून अधिक निर्माल्य टाकण्यात येते. विसर्जन तलाव आणि विहिरीमध्येही ते टाकण्यात येते. पण हे निर्माल्य प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून टाकण्यात येते. निर्माल्य टाकण्यात आल्यानंतर विधिवतपणे विसर्जन झाले का? याबाबत कोणीच विचार करीत नाही. गणेशोत्सव काळात वायू, जल आणि ध्वनी प्रदूषण होऊ नये याकरिता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जातात. पण अवेळी उपक्रम राबविण्यात येत असल्याने होणारे प्रदूषण रोखण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाला अपयश आले आहे.
दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी इको प्रेंडली गणेशमूर्ती बनविण्याचे आवाहन केले जाते. त्याचप्रमाणे फटाके लावण्यावर बंधने घातली जातात. तसेच मिरवणुकीदरम्यान डॉल्बी लावण्यात येऊ नयेत याकरिता सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दाखविण्यात येतो. पण यापलीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणत्याच योजना राबविल्या नाहीत. घरगुती गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी केवळ फिरत्या वाहनांची सुविधा उपलब्ध करण्यात येते. यामुळे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम केवळ फार्स ठरले आहेत.
इको प्रेंडली उत्सव
प्रदूषण रोखण्यासाठी इको पेंडली गणेशमूर्ती निर्मिण्यासाठी मूर्तिकारांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे प्रदूषण विरहीत गणेशोत्सव साजरा करण्याकरिता मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणत्याच योजना राबविल्या नाहीत. इको प्रेंडली गणेशमूर्ती, जल प्रदूषण न होणाऱया रंगांचा वापर आणि विशेषतः शाडूची मूर्ती बनविण्यावर भर, निर्माल्याचे विसर्जन अशा विविध बाबींचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्सवापूर्वीच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांचा उपयोग करून ध्वनी प्रदूषण रोखण्याची गरज आहे. याकरिता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना इको पेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहन देऊन बक्षीस योजना राबविण्याची गरज आहे. पण या उपक्रमाचा प्रारंभ मे महिन्यापासून करण्याची गरज आहे.
निर्माल्याचे पावित्र्य जपले जाते का?
निर्माल्य पाण्यात विसर्जन केल्यासच शास्त्राsक्त पद्धतीने विसर्जन होऊ शकते, असे समजून निर्माल्य पिशवीत घालून पाण्यामध्येच विसर्जित करतात. तथापि, प्लास्टिकच्या पिशवीत निर्माल्य कुजून दुर्गंधी सुटते. निर्माल्यावर पाणी घालून तेच निर्माल्य घरासमोरील झाडांना घातल्यास त्याचे खत निर्माण होऊ शकते. तलावात टाकण्यात आलेले निर्माल्य कचरा म्हणून जमा करून तुरमुरी कचरा डेपोमध्ये नेण्यात येते. यामुळे निर्माल्याचे पावित्र्य जपले जाते का? हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
भाविकांनी प्रदूषण रोखण्यास हातभार लावावा

गणेशोत्सव काळात निर्माल्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते. गणेश विसर्जन दीड दिवसानंतर केले जाते. तलाव, विहिरी अशा विविध ठिकाणी विसर्जन करण्यात येत असल्याने निर्माल्याचे विसर्जनदेखील तलावामध्ये करण्यात येते. यामुळे प्रत्येक विसर्जन तलावाशेजारी निर्माल्यकुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा वापर भाविकांनी करून प्रदूषण रोखण्यासाठी हातभार लावावा.
महापालिकेचे साहाय्यक पर्यावरण आभियंते एच. व्ही. कलादगी
इको प्रेंडली गणेशमूर्तीसाठी जागृती
शहरात वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच जलप्रदूषण रोखण्यासाठी काही ठिकाणी फिरत्या विसर्जन वाहनांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इको प्रेंडली गणेशमूर्ती बनविण्यासाठी शाळांमध्ये प्रात्यक्षिके दाखविण्यात आली आहेत. तसेच गणेशमूर्ती इको प्रेंडली बनविण्यासाठी जनजागृती करण्यात आली आहे.
विभागीय पर्यावरण अधिकारी जगदीश एच. आय.









