हा सामना सुरू होण्याअगोदर दोन यजमान देश आमने सामने ठाकले होते. एक यजमान ज्यांनी विजयाचा रतीब टाकला होता. तर दुसरीकडे अमेरिकेसारखा यजमान संघ विजयाचा बूस्टर डोस घेऊन वेस्ट इंडीजमध्ये दाखल झाला होता. परंतु सुपर एटमध्ये ना विजयाचा रतीब कामी आला ना बूस्टर डोस. ग्रुप स्टेजमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर, क्रिकेट विश्लेषकांच्या कौतुकानंतर अमेरिका काही चांगलं प्रदर्शन सुपर एटमध्ये करेल असं वाटलं होतं. परंतु क्रिकेटनेही इथे ठणकावून सांगितलं तुम्हीही मला गृहीत धरू नकात. सुपर एटमधील अमेरिकेच्या सलग दोन पराभवांमुळे ग्रुप स्टेजमधील दोन विजय हे फ्ल्युकच होते, हेही त्यांनी सिद्ध केले. किंबहुना अशी शंका आणण्याची पाळी अमेरिकेने आणली.
नैसर्गिक खेळपट्टी किती महत्त्वाची असते त्याची महती आता अमेरिकेला आली असेल. ड्रॉप इन पिच आणून आपण चूक तर केली नाही ना, याचाच विचार ते कदाचित करत असतील. शेवटी कृत्रिम खेळपट्टीवरून नैसर्गिक खेळपट्टीला सामोरे जाताना त्यांची दमछाक झाली हे मात्र खरं. दुसरीकडे पहिला पराभव स्वीकारल्यानंतर विंडीजने काल दुसऱ्या सामन्यात अमेरिकेचा अक्षरश: पालापाचोळा केला. त्यांच्या अचूक माऱ्यामुळे अमेरिकेचा संघ पूर्णत: बॅकफुटवर गेला. अमेरिकेतले रथी-महारथी यांनी विंडीजमध्ये मात्र आपली तलवार म्यान केली. विंडीजने ‘होप’कडून जी आशा केली होती त्या आशेला तो आपल्या नावातून जागला. होपने तर अमेरिकेच्या गोलंदाजांची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली. एखादा फलंदाज जसा एकेरी-दुहेरी धावा घेत धावफलक हलता ठेवतो अगदी त्याचप्रमाणे चौकार-षटकार खेचत ‘होप’ने धावफलक वेगाने हलता ठेवला. नेमक्या कुठल्या टप्प्यावर आणि नेमका कसा मारा करावा हा यक्षप्रश्न अमेरिकेच्या गोलंदाजांना पडला होता. यापूर्वी त्यांच्यावर अशी वेळ आली नव्हती हेही तेवढंच खरं. अमेरिकेचं विंडीजमध्ये नेमकं काय चुकलं असेल याचं ते निश्चित आत्मपरीक्षण करतीलच. परंतु याबरोबरच त्यांना आता वेगवेगळ्या देशात जाऊन वेगवेगळ्या खेळपट्ट्यांचा अनुभव घ्यावाच लागेल. अन्यथा, विजयाचे नऊ दिवस फक्त त्यांना साजरे करावे लागतील. विंडीजच्या फलंदाजांचे निश्चित कौतुक करावे लागेल. त्यांनी हा सामना जिंकलाच, पण त्या पाठोपाठ नेट रन रेटसुद्धा छान राखला.
ग्रुप दोनमध्ये आफ्रिका जवळपास उपांत्य फेरीत पोहोचली आहे. दुसऱ्या संघासाठी खऱ्या अर्थाने चढाओढ आहे. तिसऱ्या सामन्यात जर अमेरिकेने विजय मिळवला आणि दुसऱ्या बाजूने तिसऱ्या सामन्यात विंडीज पराभूत झाली आणि सरते शेवटी इंग्लंडचेही दोनच गुण राहिले तर मात्र सर्वोत्कृष्ट रन रेटवर कुठला संघ पोचतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. परंतु अशी परिस्थिती उद्भवणं सध्या तरी थोडंसं मुश्किलच वाटतंय. एकंदरीत काय अमेरिकेचा विंडीजमधील प्रवास थोडासा खडतरच वाटू लागला आहे. काही मोठा चमत्कार घडला तरच अमेरिका उपांत्यफेरीत आपल्याला दिसू शकेल. अन्यथा, विश्वकप स्पर्धेतील एका यजमान संघाला हातात नारळ मिळणार एवढं मात्र निश्चित. ही स्पर्धा हळूहळू अंतिम टप्प्यात आली आहे. ग्रुप स्टेजमधील चुकांचं आत्मपरीक्षण करून, त्यावर नीट अभ्यास करून खेळ केला तर मात्र अजूनही इंग्लंड, वेस्ट इंडीज यांना उपांत्य फेरीचे दरवाजे उघडे आहेत हेही तेवढंच खरं. एकंदरीत काय तर ही स्पर्धा रंगतेय एवढं मात्र निश्चित.









