सुवर्ण महोत्सवी वाढदिवस कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गोमंतकीयांना आवाहन : मुख्यमंत्र्यांनी जनतेचे मानले आभार

पणजी : गोव्यातील जनतेची कामे करताना सर्व मंत्री, आमदार, भाजप महिला मोर्चा, भाजप युवा मोर्चा, असंख्य कार्यकर्ते व जनता यांनी दिलेले प्रेम, पाठबळ, याबद्दल आपण त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. आपल्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण गोव्यात विविध कार्यक्रम राबविण्यात आल्याने हा आपल्यासाठी आनंदाचा आणि सुवर्णक्षण आहे. गोव्याचा विकास हा दूरदृष्टीतून होत आहे. येत्या काळात ‘स्वयंपूर्ण गोवा’चे स्वप्न साकार करायचे आहे, त्याला सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पणजी येथील भाजप कार्यालयाजवळ पक्षातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, मडगावचे आमदार दिगंबर कामत, राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर, माजी आमदार दामोदर नाईक, सिद्धार्थ कुंकळ्येकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोदी, शहांची मिळणारी मदत मोठी
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, ‘सेवा सुशासन, जनकल्याण’ असा संदेश देत सरकारने जनतेच्या कामासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. गोव्यात विकासाची गंगा वाहताना केंद्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांची मिळणारी मदत ही गोमंतकीयांसाठी फार मोठी आहे. गोव्याचा शाश्वत विकास होण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तळमळीने जनतेच्या कामाला महत्त्व द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्री सामान्यांचे कैवारी : तानावडे
प्रदेशाध्यक्ष तानावडे म्हणाले, मुख्यमंत्री सावंत हे सामान्यांचे कैवारी आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्तही त्यांनी जनतेच्या सेवेला महत्त्व देत प्रश्न ऐकून घेतले. त्यांच्या दिवसभराच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी व जनतेची लावलेली उपस्थिती ही त्यांच्या लोकप्रियतेचे उत्तम उदाहरण आहे. राज्यातील सर्व जनतेची कामे व्हावीत यासाठी ते दक्ष आहेत. भाजप कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांना दिलेल्या शुभेच्छा ह्या त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. भाजप हा तळागाळातील लोकांचा पक्ष आहे. त्यामुळे यापुढेही भाजप सर्वांगीण विकास साधेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दामोदर नाईक यांनी सूत्रसंचालन पेले. प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सर्व मंत्री, आमदार, खासदार यांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. पणजीतील अन्य एका कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांनी दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षा लाँच केल्या.
‘सेवा संगम, शिक्षा संगम’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील उच्च शिक्षण संचालनालयातर्फे इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा या ठिकाणी ‘सेवा संगम, शिक्षा संगम’ हा कार्यक्रम घेण्यात आला. यात कौशल्य, रिस्किलिंग आणि अपस्किलिंग याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त युवकांना, महिलांना विविध क्षेत्रांतर्गत आणि आयटीआय, हस्तकला पॉलिटेक्निक प्रशिक्षण देण्यासाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली. ‘सेवा संगम, शिक्षा संगम’ या कार्यक्रमाबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उच्च शिक्षण संचालनालयाचे कौतुक केले.
राज्यातील 410 गावांत ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’
गोव्यातील 410 महसुली गावांमध्ये सामान्य सेवा केंद्राची (कॉमन सर्व्हिस सेंटर) स्थापना करण्यात येणार आहे. जेणेकरून लोकांना सरकारी सेवांचा लाभ घेता येईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. भाजप सरकार हे पारदर्शी कारभार करीत असतानाच लोकांना उत्तम सेवा देणे ही सरकारची जबाबदारी असल्यानेच कॉमन सर्व्हिस सेंटरची उभारणी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.









