मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : पोषण मास 2025 कार्यक्रम : 400 जणांच्या बढतीसाठी अर्थखात्याला प्रस्ताव : बालविवाहमुक्त ग्रा.पं.साठी बक्षीस
बेळगाव : सुदृढ समाज निर्माण करून देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पोषण अभियान सुरू करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सहकार्यातून मुलांना पौष्टिक आहार देण्याबरोबरच देशाचा पाया भविष्यात मजबूत करूया, असे आवाहन महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व महिला-बालकल्याण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महात्मा गांधी भवनात मंगळवार दि. 16 रोजी पोषण मास 2025 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अन्न प्राशन, अक्षर अभ्यास, गर्भवती महिलांची ओटी भरणे, मुलांना पौष्टिक आहाराचे किट वितरण, तसेच दिव्यांगांना वाहनांचे वितरण असे कार्यक्रम झाले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन करून मंत्री हेब्बाळकर बोलत होत्या. पोषण अभियान या संपूर्ण महिन्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये हाती घेण्यात येईल, असे त्या म्हणाल्या. महिला-बालकल्याण खात्यांतर्गत गृहलक्ष्मी योजना राज्यभरातून सुरू आहे. वार्षिक 3 हजार कोटी रुपयांची ही योजना असून योजना यशस्वी करण्यास अंगणवाडी कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले आहे, असे त्या म्हणाल्या. महिला-बालकल्याण खात्याच्या कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय झाल्यास माझ्याशी त्वरित फोनवरून संपर्क साधावा, अन्यायाला कोठेही थारा देण्यात येणार नाही. खात्यातील कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आपण नेहमी आहोत. बालविवाहमुक्त ग्राम पंचायतींना आमच्या खात्याकडून 25 हजार रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले असल्याचे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांना बढती
महिला-बालकल्याण खात्यामध्ये कर्मचाऱ्यांना बढती देण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. आता त्याला चालना देण्यात आली आहे. पर्यावेक्षकांपासून साहाय्यक शिशु विकास योजना अधिकारी (एसीडीपीओ) पदापर्यंत बढती देण्यात येणार आहे. यासंबंधी खात्याच्या संचालक, सचिवांना सूचना करण्यात आली आहे. बढती देण्याच्या कार्याला लवकरच सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर पदवीप्राप्त व पीयूसी द्वितीय वर्षात चांगले गुण मिळविलेल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांना तसेच विविध टप्प्यातील कर्मचाऱ्यांना पर्यवेक्षक पदावर बढती देण्यात येणार आहे. यासाठी 400 जणांची यादी तयार करण्यात आली असून अर्थ खात्याला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री हेब्बाळकर यांनी दिली.
अंगणवाडीमध्ये पूर्वप्राथमिक वर्ग
कार्यक्रमाला उपस्थित विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी विचार मांडले. अंगणवाडीमध्ये शिक्षण घेत असलेली मुले खासगी शाळेला जाऊ नयेत, यासाठी पूर्वप्राथमिक वर्ग सुरू करण्यात येत आहेत. या कार्यात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची मुख्य भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारशी संपर्क साधून सुमारे 17 हजार सक्षम अंगणवाडी केंद्रांसाठी मंत्री हेब्बाळकर यांनी अनुदान मिळवून घेतले आहे. केंद्राकडून 50 टक्के अनुदान व कर्नाटक सरकारकडून उर्वरित 50 टक्के अनुदान मिळाले आहे. प्रत्येक टप्प्यात खात्याच्या कामाची स्वत: जबाबदारी घेऊन ते काम पूर्ण करत असल्याचे हट्टीहोळी म्हणाले. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अभिनव जैन, महिला-बालकल्याण खात्याचे उपसंचालक चेतनकुमार एन. एम., अधिकारी अनिलकुमार हेगडे, डीसीपीओ प्रवीण कौसर, महिला कल्याण अधिकारी कांचना आमरे, नामदेव बिलकर, तालुका पंचायतचे माजी अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांसह सर्व तालुक्यातील बालकल्याण योजना अधिकारी, बालविकास सल्ला सदस्य, अंगणवाडी कार्यकर्त्या, साहाय्यिका आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.









