कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्याचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजतागायत देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महाराणी ताराराणी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. त्यांच्या वैचारिक वारसा लाभलेला जिल्हा आहे. पर्यटन, ऐतिहासिक, धार्मिक, औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या कोल्हापूरला विविध विकास आराखड्यांच्या माध्यमातून देशात अव्वलस्थानी पोहोचवू, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. जिह्यात केंद्र, राज्याच्या विविध कल्याणकारी योजनांमधून सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी योगदान देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
येथील छत्रपती शाहू स्टेडियममध्ये रविवारी मुख्य शासकीय कार्यक्रमात 76 व्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्राप्त कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, ऑलिंपिक कास्यंपदक विजेता, अर्जून पुरस्कार प्राप्त स्वप्नील कुसाळे व वर्ल्ड कप खो–खो स्पर्धेत सुवर्णपदक विजेती वैष्णवी पवार, स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे वारस, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात जिल्ह्याची प्रगती सुरू आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. जिह्याच्या विकासासाठी नवनवीन उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. लाडकी बहीण, बळीराजा मोफत वीज, मुख्यमंत्री अन्नपूर्णा आदी योजनांसह मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखडा, 7 कलमी कार्यक्रमांतून लोकहिताला प्राधान्य दिले जात आहे.

- देवस्थान समितीचा आराखडा सादर
जिल्ह्यात विकासात्मक धोरणासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 576 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. भविष्यात प्रत्येक घटकासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. कोल्हापुरात इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरसाठी निधी मंजूर झाला आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थान विकास आराखडा, श्री क्षेत्र जोतिबा व आजूबाजूच्या डोंगर परिसरातील गावांच्या विकासाचा आराखडा सादर केल्याचे मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.
- रोजगार निर्मिती योजनेचे 1482 लाभार्थी
मुख्यमंत्री रोजगार निर्मितींतर्गत जिह्यात 1 हजार 482 लाभार्थी असून राज्यात अनुदान वितरणात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे. नावीन्यपूर्ण योजनेतून सामाजिक न्याय विभागाच्या सर्व शासकीय निवासी शाळा, वसतिगृहामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. जिह्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे शाळांना सुरक्षा कवच मिळणार आहे.
- पंचगंगा प्रदूषण व महापूर नियंत्रणासाठी 3200 कोटी
जिह्याला दरवर्षी महापूराचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे. महापूर नियंत्रणासाठी प्रकल्पाला जागतिक बँक 3 हजार 200 कोटींचे अर्थसहाय्य करणार आहे. पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
- लवकरच वैद्यकीय नगरीचे निर्माण
शेंडा पार्क येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्व सोयींनीयुक्त तयार होत आहे. लवकरच येथे वैद्यकीयनगरी निर्माण होणार आहे. ही बाब वैद्यकीय कल्याणाच्या दृष्टीने उपयोगी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- शेतकऱ्यांना ओळख क्रमांक
केंद्राच्या डिजीटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर फॉर अॅग्रिकल्चर अंतर्गत अॅग्रिस्टॅक हा प्रकल्प संपूर्ण देशात राबवण्यात येत आहे. यातून शेतकऱ्यांना ओळख क्रमांक दिला जाणार आहे. केंद्र आणि राज्याच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. जिह्यामध्ये 6 हजार 415 नागरी सुविधा केंद्रांमध्ये याची कार्यवाही सुरू करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
- 1 लाख विविध दाखल्यांचे वितरण करणार
घरपोच सेवा, सेवा वाहिनी, आपले सरकार वेब पोर्टल, साशल मीडिया अॅप, आपले सरकार सेवा केंद्र, क्युआर कोड संकल्पना आदीतून प्रशासन गतीमान करण्याचे नियोजन आहे. याअंतर्गत नागरिकांना 1 लाख विविध दाखले देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
- पर्यटन पुस्तिकेचे प्रकाशन
‘कोल्हापूर पर्यटन’ पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. जिह्यातील सर्व तालुक्यांमधील विविध पर्यटन स्थळांची माहिती, आकर्षक छायाचित्रे क्युआर कोडसह यात दिली आहेत. कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. क्षयमुक्त भारताची शपथ देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, मनपा प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सारथीच्या संचालक किरण कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधीसह स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.








