हितं यत् सर्वभूतानामात्मनश्च सुखावहम्।
तत् कुर्यादीश्वरे ह्येतन्मूलं सर्वार्थ सिध्दये:
सरलार्थ – ज्याने सर्व प्राणीमात्रांना लाभ होईल आणि स्वत:लाही आनंद होईल असे काम करावे. यानेच (जीवनातले) सगळे मुलभूत हेतू साध्य होतात.
आमचे आजोबा जेवताना ताटाभोवती चित्राहुती ठेवायचे. जेवणातले सर्व पदार्थ कणभर वाढायचे. मला ते कसंतरीच वाटायचं. त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण जे जे अन्न खातो त्या अन्नावर जगातील सर्व प्राण्यांचा अधिकार असतो. काही प्राणी सूक्ष्म रूपाने आपल्या अवतीभोवती वावरत असतात. तसेच किडे मुंग्या, झुरळं, पाली, उंदीर हे देखील असतात. या अन्नावरती त्यांचाही तेवढाच अधिकार आहे. ज्या पृथ्वीने आपल्याला अन्न दिलं ते त्यांनाही मिळायला पाहिजे, म्हणजे अतिशय भूक लागलेली असताना स्वत:च्या सुखाचा विचार सोडून जे या बारीक सारीक प्राणीमात्रांचा विचार करत जेवतात, ते लोक खऱ्या अर्थाने आनंदाचे मानकरी ठरतात. एक भिकारीण भीक मिळाल्यावर आपल्यातला भाकरतुकडा चिमण्यांना, कुत्र्यांना देत असते, त्यामागेदेखील हाच भाव असायचा. नाहीतर हॉटेलमध्ये जाऊन भूक नसताना मागवलेले पदार्थ खाऊन ते तसेच अर्धवट टाकणारे आज जगामध्ये हजारो लोक आहेत. त्यांना कोणते सुख मिळणार, अशावेळी आम्हाला आमच्या धर्मांनी शिकवलेली ही जी विश्वाच्या आनंदाची कल्पना आहे ती म्हणजे. ‘सर्वेपि सुखी न:संतु सर्वे संतु निरामय:’ हेच तत्व आम्हाला सांगून जाते. आमच्या धर्मात देवापुढे उभे राहिल्यानंतरसुद्धा स्वत:च्या सुखाची मागणी करण्यापेक्षा साऱ्या जगाला, सगळ्यांना सुखी ठेव असं शुभंकरोतीनंतर म्हणताना आम्ही सगळ्यांच्या सुखाचाच, आनंदाचाच विचार करत असतो आणि म्हणूनच जो असा सर्वांचा विचार करेल तोच खऱ्या अर्थाने आनंदाने जगू शकतो. एका दवाखान्यात दोन पेशंट होते. एकाची जागा खिडकीजवळ तर दुसऱ्याची दाराजवळ. दाराजवळचा पेशंट घरी कधी जाता येईल असा विचार करायचा, तर खिडकीजवळचा पेशंट केव्हाही जाणार आहोत हे त्याला माहिती असल्यामुळे तो सतत बाहेरच्या सृष्टीचे वर्णन आपल्या जवळच्या पेशंटला सांगायचा. बाहेर गुलाबाची फुलं फुलली आहेत, हिरवेगार वृक्ष आहेत, हिरव्यागार गवतांनी आच्छादलेले डोंगर आहेत आणि सुंदर असा वारा वाहतोय, सगळीकडे पक्षांचा किलबिलाट चालू आहे. असं कितीतरी नयनरम्य चित्र तो रोजच्या रोज त्या पेशंटसमोर उभे करायचा. आणि काही दिवसातच या खिडकीजवळच्या पेशंटला मृत्यू आला. तो तिथून गेल्यानंतर दाराजवळ असलेल्या पेशंटने मला त्या खिडकीजवळ ठेवा, असा आग्रह डॉक्टरांकडे धरला. खिडकीजवळ गेल्यानंतर त्यांनी जेव्हा खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं तेव्हा खिडकीबाहेर काही नव्हतं. एक पूर्ण ओसाड मैदान होतं. दवाखान्याला कंपाउंड घातलेलं होतं आणि त्याला कळेच ना की आजपर्यंत आपल्याला त्यांनी जे जे वर्णन ऐकवलं त्यातलं इथे काहीच नाही. हे ऐकल्यानंतर हे पाहिल्यानंतर या पेशंटचे डोळे उघडले की आपल्या दुखण्याचं बाऊ करण्यापेक्षा, दु:ख करण्यापेक्षा आपल्या दुखण्याला बाजूला सारून दुसऱ्याचे क्षण आनंदाचे करणारा पेशंट कमी दिवस जगला तरी तो आनंदाने जगलेला असतो, हेच यातून आपल्या लक्षात येतं. अशीच कथा वि. स. खांडेकरांनी आपल्या दोन वेगवेगळ्या गोष्टीतून सांगितली. काळा ढग जाता जाता सगळ्यांना पाणी देऊन जातो, शिंपून जातो आणि तोच स्वर्गाला प्राप्त होतो, असं ह्या गोष्टीचं त्यांनी महत्त्व सांगितले. म्हणूनच ज्ञानदेवदेखील असाच आनंद प्रत्येकासाठी मागतात. ‘आता विश्वात्मके देवे’ म्हणून सगळ्या जगाच्या सुखासाठी पसायदान मागतात पण आम्ही मात्र माणसं कोणतीही गोष्ट मिळवताना दुसऱ्याला कळत नकळत दुखावतोच. त्याच्या डोक्यावर पाय देऊन स्वत: मोठे होण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच असं वागणं सोडून आम्ही खऱ्या अर्थाने आनंदाच्या बिया पेरायला हव्यात. आजूबाजूची सृष्टी नीट बघायला हवी. फक्त दुसऱ्याला भरभरून देण्याच्या कल्पनेने झाडदेखील मोहरून येतं आणि भरभरून फळ देतं. याप्रमाणे आपणसुद्धा आनंद निर्मितीचे ध्येय बाळगू. दुसऱ्यासाठी जगा, तुमचेही जगणं सुसह्य होईलच.








