विनाअनुदानित शिक्षक संघटनेचा बैठकीत इशारा : अनुदान मंजुरीसाठी प्रयत्न करण्याची गरज
बेळगाव : राज्यातील 1995 नंतरच्या शाळांना अद्याप अनुदान दिले नसल्याने यामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना कुटुंब चालविणेही कठीण झाले आहे. त्यामुळे आता तरी विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे, या मागणीसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा बेळगाव विनाअनुदानित शिक्षक संघटनेच्या बैठकीत देण्यात आला. बेळगाव जिल्ह्यातील विनाअनुदानित शिक्षक संघाची बैठक शनिवारी चव्हाट गल्ली येथील मराठा मंडळ कॉलेजच्या सभागृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळ संस्थेचे संचालक रामचंद्र मोदगेकर होते.
1995 नंतरच्या शाळांना अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न सुरू
राज्य सहशिक्षक संघटनेचे मुख्य सचिव रामू गुगवाड म्हणाले, राज्य सरकारने 2015-20 पर्यंतच्या अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीला नुकतीच अनुमती दिली. तसेच सातव्या वेतन आयोगासाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे 1995 नंतरच्या शाळांना अनुदान मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू असून आता एकजुटीने आंदोलन केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्य शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष एस. एस. मठद म्हणाले, बेळगावमध्ये झालेली प्रत्येक आंदोलने ही आजवर यशस्वी झाली आहेत. त्यामुळे आता सर्वांनी अनुदान मंजुरीसाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सलीम कित्तूर, उपाध्यक्ष पी. पी. बेळगावकर यांनीही आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन दिले.
येत्या शनिवारपासून अनुदान मिळविण्यासाठी तीव्र आंदोलन
येत्या शनिवारपासून अनुदान मिळविण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीदरम्यान करण्यात आला. या बैठकीला एम. ए. कोरीशेट्टी, विठ्ठल होसूर, बी. एफ. कुंभार, संतोष कुरबेट, मलकर, हुलीमनी यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन मारुती अजानी यांनी केले. कोमल गावडे यांनी आभार मानले.









