कोल्हापूर :
मराठी नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. आज रविवार (दि. 30) सुर्योदयाला गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीसाठी लागणारी मेसकाठी, साखरेचा हार, देवचाफ्याची फुल किंवा माळा खरेदी करण्यासाठी शनिवारी बाजारात गर्दी होती. शनिवारी घराघरात गुढीपाडव्याची तयारी सुरू होती.
गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर मेसकाठीला भरजरी वस्त्र, तांब्या पात्र, लिंबाचा डहाळा, देवचाफ्याच्या फुलांची व साखरेची माळ लावून गुढी उभारली जाते. गुढी उभारल्यानंतर घराघरात पुरणपोळी, श्रीखंड –पुरी करून गुढीला नैवद्य अर्पण केला जातो. मराठी नववर्षातील उगवणाऱ्या सुर्य, धरणी आणि आकाशाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. कडूलिंब आरोग्यदायी असल्याने कडूलिंबाची फुल, पान, गुळ, हारभरा डाळीचे सेवन केले जाते. गुढीच्या पुजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होती. काहीजण छोटी गुढी उभारतात, त्यामुळे तयार पण लहान आकाराच्या आकर्षक गुढ्या अनेकांनी खरेदी केल्या. शहरातील चौका–चौकात चाफ्याचे हार, साखरेचे हार, मेसकाठीची विक्री सुरू होती. एकूणच घराघरात चैतन्याचे वातावरण आहे.








