रत्नागिरी :
आगामी जिल्हा परिषद, नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी रत्नागिरी जिल्हा सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अन्य जिल्ह्dयांसाठी वेळ द्यावा. सिंधुदुर्गात आमदार निलेश राणे, आमदार दिपक केसरकर आणि इथे रत्नागिरीत आम्ही सर्व आमदार असू. आम्ही या निवडणूकांमध्ये तुमच्यापुढे ढाल बनून ह्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवू, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदेना दिली.
सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्dयाच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोट्यावधींचा निधी प्राप्त झाला. यापूर्वीच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी दिला नसेल इतका भरीव निधी शिंदे यांनी दिला. दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे यांचा सत्कार करून कौतुक केले. त्यांच्या सत्काराने पोटशूळ उठलेल्यांना आजचा मेगा पक्षप्रवेश जोरदार उत्तर आहे. पक्षप्रवेशाचा हा दुसरा टप्पा आहे, पहिला टप्पा माजी आमदार राजन साळवी यांच्या प्रवेशाने झाला. अजूनही एक शिल्लक पक्षप्रवेश तो देखील पुढील महिनाभरात होईल आणि याच धनुष्यबाणाचा भगवा येथे फडकेल असा विश्वासही सामंत यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
- विजयासाठी एकजूट अशीच कायम ठेवा
ज्या नेत्याने रत्नागिरीच्या विकासाला दिशा दिली. त्यामागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका रत्नागिरीकरांनी घेतल्याबद्दल सामंत यांनी आपल्या मनोगतात समाधान व्यक्त केले. तसेच नव्याने शिवसेनेत पक्षप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना शिंदे यांच्याकडून आवश्यक आहे ते देण्यासाठी कुठेही मागे राहणार नाही कोणत्याही अन्याय होणार नाही किंवा पश्चाताप होणार नसल्याचे सांगितले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा, नगर पंचायती निवडणुका जिंकायच्या असतील तर आजचे हे एकसंघ व्यासपीठ भविष्यातही असेच कायम राहिले पाहिजे असे सामंत म्हणाले.








