आषाढात विठ्ठल भक्तांना पालखीची ओढ लागते. टाळ, मृदुंगाचा घोष साद घालायला लागतो. वारकरी बनून पंढरपूरला जाणं हा प्रत्येकाचा अगदी आनंदाचा विषय असतो. हाताने नेहमी चांगली कर्मे करून सतत पुढे जात राहणे हा नेमस्तपणा ज्यांच्याजवळ असतो त्या सगळ्यांना ही वारी घडतेच आणि म्हणूनच या सगळ्या लोकांची कर्मे देवाच्या पायी जाऊन ते निष्कर्म होतात. ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीहून श्री माऊलींची पालखी निघते तर देहूहून श्री संत तुकोबारायांची पालखी प्रस्थान ठेवते. गुरु हैबत बाबांच्या स्मरणार्थ इथे शाल आणि श्रीफळ देऊन आळंदीहून वारकरी मार्गस्थ होतात आणि सगळा आसमंत जणू विठ्ठल भक्तीने नाहून निघतो. वारकऱ्यांनी कपाळी लावलेला टिळा आता आकाशाच्या माथ्यावर सुद्धा दिसायला लागतो. हा सोहळा बघण्यासारखा असतो. अशा या पंढरीला पालखीच्या बरोबर, वारीच्या बरोबर जाणारे किती भक्तिरसात तहानलेले असतात याची अनुभूती प्रत्येकाने घ्यावी अशीच असते. असेच काही भक्त होऊन गेले. त्यांची ही कथा. संत पुरंदरदास दक्षिणेकडचे एक विठ्ठल भक्त. या विठ्ठल भक्ताचा महिमा त्यांच्या एका प्रसंगावरून आपल्या लक्षात येतो. या पंढरपूरला आज भू वैकुंठ असेही म्हणतात. या वैकुंठामध्ये वाहणारी भीमा नदी ही विष्णुपदी मानतात. तिचा आकार या ठिकाणी चंद्रकोरी सारखा झाल्यामुळे तिला चंद्रभागाही म्हटलं जातं. भीमा आणि चंद्रभागा या नदीच्या किनारी पुंडलिकाच्या नावावरून वसलेलं गाव म्हणजेच पुंडलिकपूर. ज्याला आता पंढरपूर म्हणून आम्ही ओळखतो. भक्ताच्या नावावरून एखाद्या गावाचं नाव पडल्याचा हा पहिलाच अनुभव. अशा या गावामध्ये पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना झाली. त्याला अनेक गोष्टी आहेत. या देवळामध्ये असलेला गरुड खांबसुद्धा आम्हाला काहीतरी वेगळं सांगून जातो. देवाच्या दर्शनाच्या आधी गरुड खांबाला मिठी मारून भेट घ्यायची पद्धत आहे. पुरंदरदास विठ्ठल मंदिर आवारातच रहायचा. देवाचे दर्शन घेऊन जीवन कंठायचा. याच पंढरपुरात एक उत्तम नृत्यांगना होती. ती विठ्ठलाची निस्सीम भक्त. या नृत्यांगनेला भेटायला आपण कोणत्या रूपात जावं या विचारात असतानाच पुरंदरदास विठ्ठलासमोर आले. विठ्ठलाने पुरंदरदासाचा वेश परिधान करून नृत्यांगनीच्या घरी गेला. तिची कला पाहताना देवाला मनोमनी आनंद झाला तिची कला पाहून विठ्ठलाने हातातील हिरेजडीत कंकण तिला दिले. पहाटे काकड आरतीला लोक जमले. लोकांना दर्शनाच्यावेळी देवाच्या हातातील एक कंकण नसल्याचे लक्षात आले. सगळीकडे आरडाओरड सुरू झाली. ते कंकण शोधताना पहारेकरी त्या नृत्यांगनीच्या घरीदेखील आले. तिथे कंकण सापडले. हे कंकण कोणी दिले. विचारल्यावर तिने पुरंदरदासाचे नाव घेतले. त्यांनी हे कंकण दिल्याचे सांगितले. त्याची शोधाशोध सुरू झाली. देवळाच्या बाहेर एका कोपऱ्यात निजलेला पुरंदरदास पोलिसांच्या शिपायांच्या तावडीत सापडला. त्याला बांधून देवासमोरच एका खांबाला बांधून फटके द्यायला सुरुवात झाली. त्याला काही कळेना आपल्या हातून नेमकं काय घडलंय ते. शेवटी त्याने देवाचा धावा सुरू केला. पंढरीराया मला तू सोडवायला ये, असं त्यांनी म्हटल्याबरोबर विठ्ठलाला अतिशय वाईट वाटलं. त्यांनी आपल्या हातातलं दुसरं कंकणदेखील पुरंदर दासांजवळ फेकलं आणि लोकांच्या लक्षात आलं की आपण चुकीच्या गोष्टीसाठी या माणसाला मारतोय. हा तर साक्षात विठ्ठलाचा भक्त. त्याला ज्या खांबाला बांधलं होतं त्याच्या भक्तीमुळे देव प्रसन्न झाला होता. तोच हा गरुड खांब, असेही मानतात.
Previous Articleमी म्हणजे हा देह असा संचार आत्म्यात होऊन तो भ्रमिष्ट होतो
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








