अनादि मी अनंत मी अवध्य मी भला
मारिल रिपु जगति असा कवण जन्मला
इंग्रज सरकारचे ते दैत्य फ्रान्सच्या मार्सेलिसच्या किनाऱ्यावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांना बंधित करून नेताना त्यांच्या देहाआधी त्यांच्या मनाने बाहू पिटले असावेत. अधिकच स्फुरण पावणाऱ्या भुजा थोपटून त्यांनी ब्रिटिशांना दिलेलं हे आव्हान आहे. निस्सीम सावरकर भक्त असणाऱ्या वंदनीय बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांनी त्याला संगीत देऊन ते गायलंही आहे. आत्म्याच्या अमरत्त्वाचं अक्षय तत्त्व उराशी घट्ट धरून त्यांनी ही कविता लिहिलीय. कविता कसली, सिंहगर्जनाच ती! त्यातला एक एक शब्द ठिणगीसारखा उडाला आहे आणि त्या प्रकाशात त्यांचं भोक्तव्य उजळून निघालं होतं. मी त्या परमात्म्याच्या अस्तित्त्वाचाच अविभाज्य घटक आहे. ज्याला आदि अंत नाही. म्हणूनच मी अवध्य आहे. मला मारील असा शत्रू जगात जन्माला आला नाही. खरंच ते अवध्य ठरले. थोरांच्या शब्दांना मंत्रसामर्थ्य असतं म्हणतात. संगीतक्षेत्रातील अशाच थोरांच्या स्वरांना सामवेदातील ऋचांचं सामर्थ्य असावं. शब्द आणि नाद यांचा हा खेळही फार जुना आणि अनंत आहे. अनंत म्हणजे तरी काय? ज्याला अंत नाही तो अनंत! तो कधी नष्ट होत नाही. नव्या नव्या रूपात पुन:पुन्हा येत रहातो. विष्णुदेवांच्या अनेक नावांपैकी हेही एक नाव! नवनाग स्तोत्रामधलं हे प्रथम नाव!
अनंतं वासुकिं शेषं पद्मनाभं च कंबलं
शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा
अगदी छोटं असणारं हे स्तोत्र रोज घरच्या देवाची पूजा करणाऱ्यांकडून ऐकलं नसेल असा माणूस कोकणात तरी विरळा. सुस्वर आवाजात आणि विशिष्ट आरोह अवरोह आघातांसहित म्हटलं जाणारं हे स्तोत्र सर्पभयापासून मुक्तता करणारं आहे. त या अक्षरावरील अनुस्वारामुळे नैसर्गिकरीत्या नादमय असणारा हा शब्द अनंताचं दीर्घत्त्व दर्शवतो. त्या अनंताची पूजा कित्येकांना आपापल्या मन व बुद्धीप्रमाणे करावीशी न वाटली तरच नवल!
श्री अनंता मधुसूदना
पद्मनाभा नारायणा.
तुकाराम महाराजांची लेखणी आणि मूळचा पं. सुरेश हळदणकर यांचा स्वर असलेलं हे अतिशय लोकप्रिय गीत आहे. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात खास फर्माइश केलं जाणारं हे गीत पं. रघुनंदन पणशीकर यांनीही खूप खूप श्रवणीय गायलंय. हे थोर लोक ग्रेटच! ज्याला शोधण्यासाठी हृदयात भक्तिभाव जागृत असावा लागतो, अंत: चक्षु उघडावे लागतात अशा अनंताला आपण द्यायचं तरी काय? आपला पिंड, आपला देह, आपली वृत्ती आणि आपली घडण हा सर्व ज्याच्या मायेचा भाग आहे त्याला त्यातलंच काही उचलून द्यायचं म्हणजे ‘तुझेच देणे तुला समर्पण’ असंच होतं.
नवीं भावपुष्पें तुला वाहिलीं
तशी अर्पिली भक्तिबाष्पांजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्रभू कल्पना जल्पना त्या हरो
अनंता तुला कोण पाहूं शके
तुला गातसां वेद झाले मुके.
होय! ऑल द ग्रेट अभिषेकी बुवांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली, बा. भ. बोरकर यांची हीच ती प्रसिद्ध रचना! अनंताची स्तुती. साहित्यात ज्याची लेखणी तशीच अथांग आहे त्या कवीने केलेली ही अप्रतिम रचना. संगीतातले मधुकर, श्यामरंग असलेले पंडित अभिषेकी बुवा, ज्यांचा संगीताचा रियाज आणि अभ्यास हा अगदी असाच अनंत होता. त्यांनी केलेल्या गूढगंभीर संगीतरचनांतील ही अशीच एक रचना. अक्षरश: गोफाची वीण असावी तशी चकवत नेणारी स्वररचना आहे ही! चिपळूणस्थित सुप्रसिद्ध गायक राजाभाऊ शेंबेकर यांच्याकडून हे गीत ऐकणं हा एक स्वतंत्र आनंद आहे. खडतर वाटेवरच्या अखंड मेहनतीने सिद्ध झालेल्या स्वरांची धार काय असते त्याचा श्रवणीय अनुभव म्हणजे राजाभाऊंचं गाणं! गाणं तसंही अनंत असतं. जितकं पुढे जावं तितकं तितकं तेही पुढे सरकत जातं. पन्नास वर्षं साठ वर्षं अखंड स्वरयज्ञ करणारी माणसं जेव्हा म्हणतात की ने: ति ने:ति! हे अनंत आहे. तेव्हा अनंताच्या अनेक अर्थच्छटा आहेत हे उमगायला लागतं. जितका रियाज होईल तितकं एवढंच कळतं की आपल्याला किती कमी कळतं! यापुढे बरंच काही आहे. आणि ते बरंच काही किती आहे ते तर कळतच नाही. थांगच लागत नाही. पं. गोविंदराव टेंबे म्हणत त्याप्रमाणे
नच पार नादनिधिला
विधितनया वीणा वाही तरुनी जावया
पैलतीर परि ना दिसला.
संगीत तुलसीदास या नाटकातलं हे पद अनंताचं सांगीतीक रूप दाखवून देतं. कुमार गंधर्वांसारख्या अनंत विचारशक्ती असणाऱ्या, असंख्य बारकावे टिपणाऱ्या आणि अनंत प्रयोग करणाऱ्या सव्यसाची कलाकाराने हे गायलंय. ‘मला उमजलेले बालगंधर्व’ हा बालगंधर्वांच्या नाट्यागीतांचा एक स्वतंत्र कार्यक्रम करणाऱ्या कुमार गंधर्वांनी अक्षरश: महिनोन्महिने या नाट्यागीतांचा बारकाईने विचार करून रियाज केला. उमगणं आणि उमलणं या दोन्ही क्रियांमध्ये त्यांनी इतका सुंदर स्वरसेतू बांधला की ज्यांनी बालगंधर्वांचं गायन प्रत्यक्षात ऐकलं नसेल त्यांना तो आनंदाचा ठेवा जसाच्या तसा सुपूर्द झाला. याला म्हणतात अनंताची पूजा बांधणं. अनंतचतुर्दशीचं व्रत आणखी वेगळं काय असतं? अनंताचं चौदा गाठींचं सूत्र अचानक हाती मिळावं लागतं किंवा कुणीतरी अधिकारी व्यक्तीनं अनुग्रहित करून त्या व्रताचा कलश विधिवत सोपवावा लागतो. कुमारांच्या बाबतीत दोन्ही गोष्टी घडल्या होत्या. बालगंधर्वांनी या भूमीवर मागे ठेवलेलं बारा स्वरांचं सूत्र दोन तानपुऱ्यांसोबत त्यांच्या हाती लागलं आणि तानपुऱ्याच्या तारा अखंड झंकारत ठेवणे हा तर गायकाचा कुलधर्म! असं अव्याहत सुरू राहणारं हे अनंताचं व्रत.
कैलाश खेर हा या पिढीचा लाडका गायक, शिवस्तुती करणारी अनेक जोरकस गाणी ही त्यांची खासियत! ‘अनादी अनंता’ या त्यांच्या गीतात शिवाच्या अनंत रूपाची स्तुती ऐकायला मिळते. परमेश्वर एकच असतो खरा पण त्याची रूपं मात्र अनंत आहेत. म्हणून तर
ओंकार अनादी अनंत अथांग अपरंपार
नादब्रह्म परमेश्वर सगुण रूप साकार
यासारखी गीतं आपल्याला गणेशरूपाच्याही अनंतत्त्वाची ओळख करून देतात. सलील कुलकर्णींचं हे गाणं अनंताचं ते विराटरूप अनुभवायला लावतं. सुधीर मोघे यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीताने पंडित जितेंद्र अभिषेकी आणि थेट सलील कुलकर्णी असे दोन संगीतकार अनुभवलेत. त्याचा प्रवासही रात्रिकालीन रागापासून प्रात:कालीन रागापर्यंत असा झालाय. कधीच अंत न लागणाऱ्या या अनंताकडे मागावं ते तरी काय? जसा त्याला काय द्यावं हा प्रश्न पडतो तसाच त्याच्याकडं काय मागावं हाही प्रश्न तितकाच पेचदार! असं म्हणतात की देवाकडे मागताना मूल होऊन मागावं. असं असेल तर मग
अनंता एवढे द्यावे फुलांचे रंग ना जावे.
उडाया पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे.
तान्हुल्या बाळओठांचा तुटो ना एकही पान्हा,
असूदे माय कोणाची असूदे कोणता तान्हा.
अनंता एवढे द्यावे, भुईचे अंग मी व्हावे.
शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे.
असं लक्ष्मीकांत तांबोळी यांच्याच शब्दांत मागावं लागेल. आणि शाळेत उन्मुक्त कविता गाणाऱ्या निरागस मुलांचे आदिम संस्कारित स्वर सहज त्या अनंतापर्यंत पोहोचतील.
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु








