कर्नाटकातील नेत्यांना काँग्रेस श्रेष्ठींचा कानमंत्र : दिल्लीत मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांची खलबते
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीतील यशानंतर पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी काँग्रेसश्रेष्ठींनी तयारी सुरू केली आहे. याच उद्देशाने नवी दिल्लीत कर्नाटकाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या बैठका घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला प्रारंभ करण्यात आला आहे. बुधवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, वरिष्ठ नेते राहुल गांधी, के. सी. वेणूगोपाल, रणदीप सुरजेवाला, दिग्विजय सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी राज्यातील नेत्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
बुधवारी दुपारी झालेल्या पहिल्या बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांबरोबरच मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, आर. व्ही. देशपांडे, एम. बी. पाटील, के. एच. मुनियप्पा, एच. सी. महादेवप्पा, बी. के. हरिप्रसाद तसेच राज्य काँग्रेसचे कार्याध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तर सायंकाळी दुसऱ्या फेरीतील बैठक झाली. यावेळी राज्यातील सर्व मंत्र्यांसह एकूण 50 जण सहभागी झाले होते. याप्रसंगी कर्नाटकात पक्षाला पोषक वातावरण असल्याने लोकसभा निवडणुकीत किमान 20 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मंत्र्यांवर सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर समिती नेमून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवड, पूर्वतयारी, रणनीती, प्रचार, पक्षसंघटना करण्याची जबाबदारी देण्याबाबत चर्चा झाली. त्याचप्रमाणे विद्यमान मंत्र्यांपैकी चार-पाच जणांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्याचा विचार आहे. तिकीट नाकारण्याचे धाडस करू नये. वरिष्ठांच्या निर्णयाशी प्रत्येकाने बांधील असावे, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.
भ्रष्टाचाराच्या आरोपांना वाव नको!
राज्य सरकारला भ्रष्टाचाराचा डाग बसणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी सक्त सूचना वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी दिली. पारदर्शक पद्धतीने प्रशासन चालवावे. राज्यातील नेत्यांच्या कामकाजावर वरिष्ठांची नजर असेल. भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करून भाजपविरुद्ध आंदोलन केले आहे. काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप होऊ देवू नका, असा कानमंत्र त्यांनी दिला.
गॅरंटींवरच भरवसा
राज्यात जारी केल्या जात असलेल्या गॅरंटी योजनांवर अधिक लक्ष केंद्रीत करा. कर्नाटकातील प्रत्येक मध्यमवर्गीय आणि गरीब जनतेला गॅरंटी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेचा प्रभावी वापर करा. इतर राज्ये कर्नाटकाकडे पाहत आहेत. कर्जाचा भार पडणार नाही, याची दक्षता घ्यावी. उपलब्ध संसाधनांचा वापर करून गॅरंटी योजनांसाठी निधीची जुळवाजुळव करा. पाच गॅरंटी योजना देशाच्या आर्थिक धोरणासाठी गेम चेंजर ठरतील. गॅरंटी योजनांचे यश राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाला भक्कम पाया बनायला हवा, असा सल्लाही राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंत्र्यांना दिला.
सोशल मीडियाचा सदुपयोग करा
कर्नाटकात लोकसभेच्या 22 ते 24 जागा जिंकण्याची संधी आहे. बेंगळूरमध्ये आयएनडीआयए (इंडिया) ची बैठक अत्यंत यशस्वी झाली आहे. त्यामुळे राष्ट्र पातळीवर कर्नाटक खूप मोठे बदल घडवून आणत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उत्तम उमेदवार सूचवा. संपूर्ण पक्ष सरकारच्या पाठिशी आहे. पाच गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हानिहाय बैठका घ्याव्यात, युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा सदुपयोग करा, लहान-लहान समुदायांना एकत्र आणून त्यांना सरकारच्या योजनांविषयी जाणीव करून द्या, अशी सूचनाही काँग्रेसश्रेष्ठींनी मंत्र्यांना दिली.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाचे एक कार्यालय सुरू करा. जिल्हा पातळीवर पक्षाच्या कार्यालयांनी अधिक सक्रिय असायला हवे. लोकसभा निवडणुकीसाठी आतापासून तळापासून पक्षसंघटना करावी. मंत्र्यांनी कार्यकर्त्यांशी संपर्कात असावे.
आमदारांसमवेत समन्वयाने काम करा!
पक्षांतर्गत नाराजी उद्भवणार नाही, अशा पद्धतीने कामे करा. मंत्री आणि आमदारांमध्ये समन्वय असला पाहिजे. पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसणार नाही, याची काळजी घ्या, आमदारांना सहकार्य करा, त्यांना विश्वासात घेऊनच कामे करा. स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या सहकार्याने मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा महत्त्वाच्या सूचनाही मंत्र्यांना करण्यात आल्या आहेत.
कोट्स….
कर्नाटकातून 20 जागा जिंकून देणार
आगामी लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ मित्रगटाला कर्नाटकातून 20 जागा जिंकून देण्याची ग्वाही दिली आहे. आम्ही सर्वजण एकत्र आहोत. आम्ही भाजपप्रमाणे दिशाभूल करत नाही. संपूर्ण देशासमोर कर्नाटकाला आदर्श राज्य बनविले आहे.
– डी. के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री
गॅरंटींचे ‘कर्नाटक मॉडेल’ प्रभावी ठरणार
पाच गॅरंटी योजना जारी केल्याने कर्नाटक मॉडेल’ लोकसभा निवडणुकीवेळी प्रभावी ठरणार आहे. आम्हाला 20 ते 24 जागा जिंकण्याची आशा आहे. वरिष्ठांसमवेत दोन बैठकांमध्ये लोकसभा निवडणूक आणि गॅरंटी योजनांच्या यशाचा लाभ निवडणुकीत करून घेण्याबद्दल चर्चा झाली आहे.
– सिद्धरामय्या, मुख्यमंत्री









