काँग्रेसच्या घोषणापत्रात अजब आश्वासन : मोफत वीज, ओपीएस लागू करणार
वृत्तसंस्था/ भोपाळ
काँग्रेस पक्षाने मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी स्वत:चे घोषणापत्र जारी केले आहे. यात युवांपासून महिला अन् शेतकऱ्यांकरता अनेक महत्त्वाच्या घोषणांचा समावेश आहे. पक्षाने यावेळी राज्यात मोफत वीज पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. तर सर्वात खास आश्वासन आयपीएल टीमसंबंधीचे आहे. आयपीएलमध्ये मध्यप्रदेशचा संघ समाविष्ट व्हावा म्हणून प्रयत्न केले जाणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
काँग्रेस राज्यात सत्तेवर आल्यास तांदूळ अडीच हजार रुपये प्रति क्विंटल तर गहू 2600 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केले जाईल असे घोषणापत्रात नमूद करण्यात आले आहे. याचबरोबर 2 किलो या दराने शेण खरेदी करण्यात येणार असल्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.
पक्षाने महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये तर 500 रुपयांमध्ये घरगुती गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. 1 कोटीहून अधिक वीज ग्राहकांना 100 युनिट वीज मोफत तर 200 युनिटपर्यंतच्या वीजेसाठी निम्मा दर आकारण्याचे आश्वासन घोषणापत्रात सामील आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार असल्याचे पक्षाकडून नमूद करण्यात आले आहे.
पक्षाने घोषणापत्रात मध्यप्रदेशसाठी 6 महिन्यांमध्ये 4 लाख शासकीय पदे भरण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच बेरोजगार पदवीधरांना दर महिन्याला 3 हजार रुपयांचा भत्ता देण्यात येईल असे आश्वासन घोषणापत्रात सामील आहे.
पक्षाकडून देण्यात आलेली महत्त्वाची आश्वासने
– जय किसान कृषी कर्ज माफी योजना सुरू ठेवली जाईल, शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार.
-महिलांना दर महिन्याला 1500 रुपये नारी सन्मान निधीच्या स्वरुपात देण्यात येणार.
-घरगुती वापराचा गॅस सिलिडर 500 रुपयांमध्ये देण्यात येणार.
-इंदिरा गृह ज्योती योजनेच्या अंतर्गत 100 युनिट वीज मोफत, 200 युनिटकरता निम्मा दर द्यावा लागणार.
-जुनी पेन्शन योजना राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी लागू करणार.
-शेतकऱ्यांना सिंचनाकरता 5 हॉर्सपॉवरची वीज मोफत प्रदान करणार.
-शेतकऱ्यांची वीज थकबाकी माफ करणार.
-शेतकऱ्यांवरील नोंद गुन्हे मागे घेतले जाणार
-दिव्यांगांना मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम वाढवून 2000 रुपये करणार.
-मध्यप्रदेशात जातनिहाय जनगणना करविण्यात येणार.
-शासकीय सेवा अन् योजनांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण.
-संत शिरोमणी रविदास यांच्या नावावर कौशल्य विकास विद्यापीठ.
-सरकारी शाळेतील मुलांना दर महिन्याला आर्थिक मदत देणार.









