मिरामार येथील विज्ञान केंद्रात ‘व्हेल शार्क दिन
प्रतिनिधी/ पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दूरदृष्टीतून व्हिजन ठेवले आहे. हे व्हिजन शार्क माशांचे संरक्षण होण्यासंबंधी महत्त्वाचे आहे. त्यामुळे शार्क माशाच्या रक्षणार्थ गोवा राज्याच्यावतीने धोरण आखू, असे वनमंत्री विश्वजित राणे यांनी जाहीर केले. मिरामार येथील विज्ञान केंद्रात व्हेल शार्क दिनानिमित्त अयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री राणे बोलत होते. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री दीया मिर्झा, गोव्याचे नामांकित मच्छीमार पेले, आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री राणे म्हणाले, व्हेल शार्क माशाच्या रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बोट गोव्यात आणण्यासाठी वनखाते प्रयत्न करेल. गोव्याच्या सायन्स सेंटर आणि प्लेनेटरियम यांनी ‘सेव्ह व्हेल शार्क’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाला आपला पूर्ण पाठिंबा राहील, असेही राणे म्हणाले.
वन खात्यामार्फत मरिन कन्झर्वेशन धोरण आखले जाणार आहे. युकेतून एक मोठे जहाज खरेदी करून त्याद्वारे व्हेल माशाचे संरक्षण केले जाईल. या कामासाठी व धोरण राबविण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्ती करणार आहे. या समितीत अभिनेत्री दीया मिर्झा, पेले यांच्यासह तज्ज्ञ लोकांची निवड केली जाईल, असे राणे पुढे म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी व्हेल शार्क, मगर व इतर प्राण्यांच्या रक्षणासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी वेगळे धोरणही ठरवले आहे. गोवा राज्य याबाबत धोरण तयार करून पंतप्रधान मोदी यांचे व्हीजन पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न साकार करणारे गोवा हे पहिले राज्य ठरण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे. गुजरातच्या धर्तीवर गोव्यातील मच्छीमार बांधवांसाठी काही योजनाही तयार करू, असे आश्वासन मंत्री राणे यांनी दिले.









