महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोव्याला ग्वाही. तिळारी धरणाची उंची वाढविण्यावर एकमत
प्रतिनिधी/ पणजी
म्हादईचे पाणी वळविण्यापासून कर्नाटकला रोखण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा संयुक्तपणे लढा देतील, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्याचबरोबर गोवा आणि महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी धरणाची उंची वाढवितानाच कालव्यांचीही दुऊस्ती प्राधान्याने हाती घेण्यात येईल, असेही शिंदे यांनी सांगितले.
तब्बल 13 वर्षांनंतर झालेल्या तिळारी पाटबंधारे प्रकल्पाच्या आंतरराज्य नियंत्रण मंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्यासह दोन्ही राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. गोवा हा महाराष्ट्राचा लहान बंधू आहे. त्यामुळे गोव्याच्या आमच्याकडून ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू व कर्नाटक विऊद्ध म्हादईचा संयुक्तपणे लढू, असे शिंदे म्हणाले.
तिळारी धरणाची उंची वाढविण्यापूर्वी संपूर्ण अभ्यास करण्यात येईल. मात्र कालव्यांची दुऊस्ती प्राधान्याने हाती घेण्यात येईल, असे सांगून या दुऊस्तीकामासाठी सुमारे 330 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. या बैठकीत धरणाची उंची वाढविणे, वारंवार फुटणारे कालवे, धरणग्रस्तांना नुकसानभरपाई व त्यांचे पुनर्वसन यासारख्या अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
गोवा आणि महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी धरणामुळे पेडणे, बार्देश, डिचोली आदी तालुक्यातील लोकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणीपुरवठा होतो. आता त्यात मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाचीही भर पडली आहे. त्यामुळे गोव्यासाठी हा प्रकल्प फार महत्त्वाचा ठरला आहे. या धरणात मुबलक पाणी उपलब्ध असले तरीही त्याचे कालवे पुन्हा पुन्हा फुटत असल्याने पाणी वाया जात आहे. ते रोखण्यासाठी कालव्यांची दुरुस्ती त्वरित हाती घेण्याच्या गरजेवर बैठकीत प्राधान्याने भर देण्यात आला.
दरम्यान, या बैठकीचे फलित सांगताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी खूपच चांगले सहकार्य केल्याचे सांगितले. पाण्याच्या महत्त्वपूर्ण विषयाबरोबरच सर्वच क्षेत्रात यापुढेही असेच सहकार्य लाभेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व तिळारीप्रश्नी महाराष्ट्र सरकारकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
पुढे बोलताना त्यांनी येत्या 30 दिवसांच्या आत तिळारीचे कालवे दुऊस्त करण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने दाखविली आहे, अशी माहिती दिली. या बैठकीत तिळारी धरणाची उंची वाढविणे तसेच कालव्याची दुऊस्ती करणे हे प्रमुख विषय होते, असे त्यांनी सांगितले.
जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी बोलताना, पाणी वाटपच नव्हे तर अन्य विषयातही महाराष्ट्रासोबत सहकार्य वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
बैठकीस महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य वित्त सचिव डॉ. नितीन करीर, अतिरिक्त मुख्य महसूल सचिव राजगोपाल देवरा, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, तसेच गोव्याचे जलस्रोत सचिव सुभाष चंद्रा, मुख्य अभियंता प्रमोद बदामी, अधिक्षक अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर, कार्यकारी अभियंता मिलिंद गावडे आदी उपस्थित होते.
तिळारी प्रकल्प दृष्टीक्षेपात
21.93 टीएमसी एवढी क्षमता असलेल्या तिळारी प्रकल्पाचा 76.70 टक्के खर्च गोवा राज्याने उचलला आहे. त्याद्वारे गोव्याला 16.10 टीएमसी व उर्वरित 5.83 टीएमसी पाणी महाराष्ट्राला मिळते. प्रकल्पामुळे गोव्यातील 21197 हेक्टर जमीन तर महाराष्ट्रातील 6776 हेक्टर जमीन सिंचनाखाली येते.