स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आघाडीबाबत चर्चा सुरू
सांगली : सिद्धेवाडी प्रकल्पाच्या कालव्याच्या कामांवरून सुरू असलेल्या श्रेयवादावर आता संजयकाका पाटील यांनी थेट आमदार रोहित पाटील यांना साद घातली आहे. पाण्याचं राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्रांवर एकत्र लढणं अधिक गरजेचं आहे, असं प्रतिपादन करत त्यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषद घेतली.
या निमित्ताने स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत काका आणि काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेते एकत्र येऊन चर्चा करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात पारंपरिक स्पर्धकांमध्ये सुरू असलेला श्रेयाचा वाद थांबवा या मागणीसाठी ज्येष्ठ मंडळींनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर पाटील यांनीही पत्रकार परिषद घेऊन रोहित पाटील यांना आवाहन करत शेतकऱ्यांसाठी खांद्याला खांदा लावून लढण्याचे आवाहन केले. याला रोहित पाटील यांचा प्रतिसाद काय असेल आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही काही परिणाम करते का याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
संजयकाका म्हणाले, सिद्धेवाडी प्रकल्पाच्या कालव्याच्या दुरुस्तीची गती मी खासदार असतानाच २०२३ मध्येच वाढवली होती. तत्कालिन जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीसयांच्याकडे पाठपुरावा करून संबंधित प्रस्ताव सादर केल्यानंतर कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी अहवाल दाखल केला आणि २४.६२ कोटीच्या कालवा दुरुस्ती कामांना मान्यता दिली. आता या कामांचं श्रेय घेऊन राजकीय प्रसिद्धीसाठी गोंधळ निर्माण करणं योग्य नाही.
पाटील म्हणाले, आज तालुक्यातील द्राक्ष, डाळिंबाच्या बागा तोडल्या जात आहेत. अशा स्थितीत दोषारोप थांबवून शेतकऱ्यांना उभं करण्याची वेळ आली आहे. मतभेद विसरून शेती प्रश्नांसाठी लढणं हाच काळाचा आग्रह आहे. सत्तेच्या मोहात न अडकता शेतकऱ्यांसोबत राहून संघर्ष उभारणं आवश्यक आहे.
आघाडीबाबत त्यांचाही प्रस्ताव!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी मान्य केले. यापूर्वी आमदार जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. आमदार विश्वजीत कदम यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी एकत्र बसण्याचा प्रस्ताव दिला आहे. पुढील काही दिवसात आम्ही या विषयावर बैठक घेणार आहोत.
काकांच्या व्याकरणाचा अभ्यास करून ठरवतो
संजयकाकांच्या आवाहनाबाबत ‘तरुण भारत संवाद’ने आमदार रोहित पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, काकांनी मला काल एका व्यासपीठावर येण्याचे आव्हान केले होते. त्याबद्दल मी विचार करत होतो. तोपर्यंत आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी आवाहन केल्याचे समजले. त्यांच्या मराठीची काही गफलत झाली आहे की व्याकरणाची याचा मला अभ्यास करावा लागेल. तो अभ्यास झाला की उत्तर देतो.








