काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे आश्वासन : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक
वृत्तसंस्था/ सागर
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मध्यप्रदेशात बिहार सरकारप्रमाणे मोठी राजकीय घोषणा केली आहे. मध्यप्रदेशात काँग्रेस सत्तेवर येताच जातीय सर्वेक्षण करविले जाईल असे खर्गे यांनी मंगळवारी म्हटले आहे. यापूर्वी बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे सरकार जातीय सर्वेक्षण करवित आहे.
मध्यप्रदेशात चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यात भाजपला सत्तेवरून दूर करण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे. याचनुसार खर्गे यांनी मंगळवारी राज्यातील सागर येथे जाहीर सभा घेतली आहे. यादरम्यान त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री कमलनाथ उपस्थित होते. या सभेदरम्यान खर्गे यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
मध्यप्रदेशात काँग्रेसचे सरकार येताच सागर येथे संत रविदास यांच्या नावाने विद्यापीठ सुरू केले जाणार आहे. राज्यात काँग्रेस सरकारकडून जातीय सर्वेक्षण करविण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींवर निशाणा
खर्गे यांनी सागर येथे रविदास यांचे मंदिर निर्माण करण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भाजपला निवडणुकीच्या काळात आता संत रविदास यांची आठवण होऊ लागली आहे. मध्यप्रदेशात एका व्यक्तीचे 18 वर्षांपासून सरकार आहे. मोदी हे 13 वर्षे गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते, पंतप्रधान म्हणून लवकरच ते 10 वर्षे पूर्ण करणार आहेत. मोदींचे सरकार राहिले असूनही गुजरात सध्या सर्वात पिछाडीवरील राज्य ठरले असल्याचा दावा खर्गे यांनी केला आहे.
स्वातंत्र्य काँग्रेसने मिळवून दिले
स्वातंत्र्यासाठी लढणारे कोण होते? त्यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा जन्मही झाला नव्हता. स्वातंत्र्य आम्ही मिळवून दिले. राज्यघटना आम्ही तयार केली, तरीही ते आम्ही काय केले अशी विचारणा करतात. भाजपने भय दाखवून स्वत:चे सरकार स्थापन केले आहे. मध्यप्रदेशात 16 आमदारांनी पैसे देऊन अन् मंत्रिपदाचे आमिष दाखवून भाजपने सरकार स्थापन केले होते अशी टीका खर्गे यांनी केली आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवू
भाजपला सत्तेपासून दूर न केल्यास जनतेला ते उद्ध्वस्त करतील. मणिपूरसारख्या राज्यात भाजपमुळेच अनागोंदीची स्थिती आहे. पंतप्रधान मोदी मणिपूरमध्ये जाण्यास तयार नाहीत तसेच त्याविषयी ते बोलणे टाळत आहेत. तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसा सुरू असूनही मोदी मौन बाळगून आहेत. तर राहुल गांधी यांनी 4 हजार किलोमीटरची यात्रा करून भारत जोडण्याचे काम केले. काँग्रेसवर लोकांचा भरवसा आहे. कर्नाटकातील लोकांनी भाजपला हटविले असून मध्यप्रदेशातही हटवावे लागणार असल्याचे खर्गे म्हणाले.









