डब्लूइएफ परिषदेचा समारोप : युक्रेन, ऊर्जा,खाद्य संकटासह अन्य विषयांवर चर्चा
वृत्तसंस्था/ दावोस
आता सर्वांनी हातात हात घालून उत्तम जगाची निर्मिती आगामी काळात करावी असे आवाहन पाच दिवसांपासून दावोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्लूइएफ) च्या वार्षिक परिषद 2022 च्या समारोप प्रसंगी करण्यात आले आहे.
सदरच्या परिषदेत युक्रेन रशिया युद्ध, ऊर्जा आणि खाद्य संकट, पाणी हवा बदल तसेच जागतिकीकरणात होणारी बदलती स्थिती यासह अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली. यात जवळपास जगातील विविध देशांमधील 2,500 प्रमुख नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
यावेळची परिषद ‘निर्णायक वळणावर इतिहास, सरकारी धोरणे व व्यवसाय रणनीती’ या शिर्षकासह सुरू झाली होती. यामध्ये व्यापार, सरकार आणि समाजातील जागतिक नेत्यांनी जवळपास 450 सत्रात सहभाग नोंदवला.
डब्लूइएफचे अध्यक्ष बोर्ग ब्रेंडे यांनी समारोप सत्रात म्हटले…
एक असे जग असायला हवे जिथे आपण भेटून सर्वांनी मिळून काम करावं, न की असं जग असावं जिथे फक्त स्वतःसाठीच जगावं. सर्वांनी मिळून आपण उत्तम जगाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे डब्ल्यूइएफचे अध्यक्ष बोर्ग ब्रेंडे यांनी समारोपप्रसंगी म्हटले आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर ही परिषद आयोजीत करण्यात आली होती ज्यात भारतातील 100 व्यावसायिक प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. या परिषदेत भारतीयांनी गुंतवणूकदारांना मनवण्याचे हरतऱहेचे प्रयत्न केले व कोरोनातील आलेल्या अनुभवांचे कथनही परिषदेत उपस्थितांना केले गेले.









