सांगली :
बेंदूर गावोगावी मोठ्या उत्साहात साजरा होतो. पूर्वी बेंदूर सण नैसर्गिक पद्धतीने साजरा केला जायचा. पण काळाच्या ओघात बेंदूर साजरा करण्याची पद्धत बदलत गेली. बेंदूर साजरा करूया, पण बैलांवर अन्याय नको. तसेच शिंगे तासू नये व रासायनिक रंग लावू नयेत, असे आवाहन अॅनिमल राहत संस्थेने बैल मालकांना केले आहे.
बेंदूर हा सण महाराष्ट्रात बैलांसाठी महत्वाचा मानला जातो. पण या सणावेळी बैल सुंदर दिसण्यासाठी त्यांची शिंगे तासणे, शिंगाना व शरीरावर रासायनिक रंग लावणे, त्यांना डॉल्बीसमोर मिरवणुकीत तासनतास उभे करणे, या सर्व चुकीच्या पद्धतीमुळे बैलांना वेगवेगळे त्रास व आजार होतात. ते टाळण्यासाठी अॅनिमल राहतने बैलांच्या मालकांना भावनिक आवाहन केले आहे.

अॅनिमल राहतचे डॉ. अजय बाबर यांनी बेंदूर बैलांचा गौरव करण्यासाठी त्यांच्याबाबत कृतज्ञता व आभार व्यक्त करण्यासाठी असतो. बैलांना अनैसर्गिक शिक्षा करण्यासाठी नसतो. त्यामुळे बेंदूर साजरा करताना बैलांवर अन्याय होणार नाही, असा साजरा करण्याचे आवाहन केले आहे. अॅनिमल राहत संस्था सांगली व सातारा जिल्ह्यांमध्ये बैलांप्रती प्रेमभावना वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवत आहेत. इच्छुक शेतकऱ्यांना त्यांच्या बैलांच्या तपासणी व उपचारासाठी संस्था मदत करत आहे. सणावेळी केले जाणारे सर्व प्रकार बैलांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी अत्यंत घातक आहेत. यामुळे जनावरांच्या डोळ्यातून वारंवार पाणी येणे, डोळ्यांचा आणि शिंगाचा कर्क रोग होऊ शकतो.
म्हणून असे आजार आणि बैलांना होणारा त्रास टाळण्यासाठी संस्थेतर्फे बेंदूर साजरा कसा करावा, हे सांगण्यात आले आहे.
- हे करा…..
शिंगे तासू नका, त्याऐवजी रंगीत रेबिन वापरा.
रासायनिक रंग न लावता फुलांनी सजवा.
डॉल्बीच्या आवाजासमोर उभे करणे टाळा.
जबरदस्तीने नाचवू नका.
उत्सव शांततेत साजरा करा.
त्यांना भरपूर आराम द्या.
पुरेसा आहार व पाणी द्या.
वेसण ऐवजी म्होरकी वापरा.
एक दावे वापरा.
बैल आणि इतर जनावरांना दररोज खरारा करा.








