रामायणात अश्वमेधाचा घोडा अडवला तो लवकुश यांनी. काल-परवा क्रिकेटच्या बड्या मंचावर ऑस्ट्रेलियाने ती कामगिरी करत मोठमोठ्या क्रिकेट विश्लेषकांना अक्षरश: तोंडावर आपटलं (यात माझाही नंबर आहे बरं का!) या सामन्यावरून एक मात्र निश्चित की भविष्यात क्रिकेट रसिक अशा महत्वपूर्ण सामन्यात अंदाज किंवा टीका टिपणी करणार नाही, याची दक्षता घेतील. असो.
सोमवारी विश्वचषक नावाचे वादळ शांत झालं. मागील 40 ते 45 दिवस फक्त क्रिकेट आणि क्रिकेटची चर्चा. काही मित्र माझ्याशी खाजगीत चर्चा करताना नेहमी म्हणतात, काय विजयराव, तुम्ही नेहमीच क्रिकेटबद्दलच बोलता, बाकी इतर खेळाबद्दलही बोला थोडं. त्यावर मी ताडकन म्हणालो, मी इतरही खेळांची चर्चा करतो. भारताचा हॉकी संघ म्हणा, पीव्ही सिंधू म्हणा, मनिका बत्रा, नीरज चोप्रा यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. या सर्व मंडळींनी देशाची मान उंचावली, त्या त्या वेळी तोंडभरून कौतुक केलेच आहे. परंतु काही मंडळी विनाकारण क्रिकेट या खेळावर राग काढतात. काही जणांचे तर असं म्हणणं आहे, ते बघा अमेरिका आणि चीन यासारखे महासत्ता असणारे देश क्रिकेटकडे ढुंकूनही बघत नाहीत. ऑलिम्पिकमध्ये खोऱ्याने मेडल मिळवतात. मान्य आहे की आपण थोडे ऑलिम्पिकमध्ये मागे आहोत. याचा अर्थ त्यांनी क्रिकेटचा द्वेष करावा असा होत नाही. त्यांनीही प्रयत्न करावेत, त्यांनीही मैदानात उतरावं. अफगाणिस्तान, नेदरलँड, बर्मुडा यासारख्या संघानी आपले नशीब आजमावून बघितलेच की. तुम्ही आजमावा. प्रत्येक खेळात एक गोडवा असतो. माझ्यासारख्या एकाद्याला क्रिकेटमध्ये थोडासा जास्त वाटतो एवढेच काय ते. असो.
काल परवा क्रिकेटमध्ये आपल्या मनासारखं काही घडलं नाही. जे 10 सामन्यात आपल्या मनासारखं घडलं ते 11 व्या सामन्यात घडलं नाही. सर्वच गोष्टी आपल्या आयुष्यात मनासारख्या घडत नाहीत. 2023 चा वर्ल्डकप त्यापैकीच एक होता असं आपण समजू. आपले दोनाचे चार हात होत असताना, आपल्या मनात काही वेगळं असतं तर कधी कधी घरच्या मंडळींच्या मनात काही वेगळेच असतं. कधी कधी आपल्या मनाला सावरावं लागतं आणि आपल्याला घरच्यांसोबत जावं लागतं. कारण ते नियतीला मान्य असते. काल-परवाचा पराभव नियतीला मान्य होता. प्रत्येक पेपर छान सोडवला. परंतु शेवटचा पेपर थोडासा अवघड गेल्यामुळे, जिथे 98 ते 99 टक्के गुण मिळाले पाहिजे होते, तिथे 90 टक्केवर समाधान मानावे लागले. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी समझोता हा करावाच लागतो. त्याला काल-परवाचे क्रिकेटही अपवाद राहिला नाही.
पाश्चात्य देशात फुटबॉलला जशी क्रेझ आहे तशी भारतात क्रिकेटला. कारण क्रिकेट पाच वर्षापासून ते 70 वर्षाच्या वयस्कर व्यक्तींपर्यंत ते आपोआप त्यांच्या हृदयात पोहोचतं. कुणी किती काहीही म्हटलं तरी भारत हा क्रिकेटवेडा देश आहे. 1983 मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर अफाट जनसागर मुंबईत उसळला होता. त्यानंतर 2011 मध्ये तर मुंबईची पंढरी खऱ्या अर्थाने धन्य झाली होती. परंतु काल-परवा शंभर टक्के विजय आपलाच आहे, असं गृहीत धरून चालत असताना अचानक झालेला पराभव तमाम क्रिकेटरसिकांना भळभळती जखम देऊन गेला.
असो. हे दु:ख आपल्याला आता विसरावंच लागेल. आपल्या घरात कर्ता पुरुष गेल्यानंतर सुद्धा पंधरा दिवसानंतर आपल्याला आपल्या संसाराचा गाडा चालवावाच लागतो. तिथे क्रिकेट काय चीज आहे. अर्थात या क्रिकेटने आपल्याला 40 ते 45 दिवस खूप आनंद दिलाय. काही दु:खांवर मलमही लावलंय. अंतिम सामन्यातील दु:ख आपण विसरून पुन्हा एकदा आपण आपल्या संसारात रममाण होऊया. पुन्हा एकदा विजेत्या ऑस्ट्रेलियाचे, आणि उपविजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन! संघाचे त्रिवार अभिनंदन!!!









