सुजनो न याति वैरं परहितनिरतो विनाशकाले:पि।
छेदे:पि चन्दनतरु: सुरभयति मुखं कुठारस्य:
(भर्तृहरि)
सरलार्थ- नेहमी इतरांच्या हिताचाच विचार करणारे सज्जन लोक विनाशकाळातही वैऱ्याशीसुद्धा वैर करत नाहीत. चंदनाच्या झाडाला तोडणाऱ्या कुऱ्हाडीच्या पात्यालासुद्धा ते झाड सुगंधच देते.
सुभाषिताचा अर्थ वाचला आणि अनेक गोष्टी एकदम फेर धरून नाचायला लागल्या. एकदा बसमधून जात असताना रात्रीच्या वेळी खूप उशीर झाला होता. बस लांब पल्ल्याची असल्यामुळे प्रत्येक जणच बस मिळावी यासाठी धावपळ करत होता. बस अगदी खचाखच भरली. कंडक्टर कसा बसा तिकीट देत पुढे सरकत होता. इतक्यात ड्रायव्हरच्या केबिनमधून गाडी सुरू होत नसल्याचे आवाज यायला लागले. काही केल्या गाडी सुरू होत नव्हती. कंडक्टर ओरडला, काहीजण खाली उतरा, बस सुरू होत नाहीये, कोणीही धक्का मारायला उतरेना किंवा गर्दी कमी करेना, उतरेना. शेवटी दारामध्ये असलेला एक जण खाली उतरला आणि तेवढ्यानेच बस सुरू झाली. मी सहज बाहेर डोकावून पाहिलं. उतरलेला माणूस हातामध्ये कुबडी घेऊन होता. लंगडत निघाला होता. आता त्याच्या घराचं इतक्या लांबचं अंतर तो एकटा चालत जाणार होता. पण एकाच्या वजनामुळे अनेक जणांना वेळेत घरी पोहचता येणार होते. या कल्पनेनेच त्यांनी जी कृती केली ती माझ्या मनाला स्पर्शून गेली.
अशीच एक कथा पुराणामध्ये दधीची ऋषींच्याबाबतीत सांगितली जाते. जेव्हा राक्षसांचा त्रास वाढला, त्यावेळेला एखाद्या तपस्वी माणसाच्या हाडांपासून बनवलेल्या शस्त्रानेच राक्षसांचा खात्मा होऊ शकणार होता. अशी गोष्ट जेव्हा दधीची ऋषींच्या कानावर आली तेव्हा त्यांनी ताबडतोब स्वत:ची हाडं देण्याचं सर्व देवांना कबूल केलं. कारण देव किंवा चांगुलपणा जर या जगात जगला नाही तर सर्वत्र अनाचार माजेल. म्हणूनच एखाद्या माणसाचा जीव गेला तरी चालेल पण पृथ्वीचा निर्वंश होता कामा नये. ही भावना त्यांच्या या कृतीमध्ये होती. अगदी आत्ताच्या काळात कोरोनात नागपूरमध्ये घडलेली घटना. एक 90 वर्षाचे आजोबा अॅडमिट होते पण त्याचवेळी इतर सर्व बेड भरले असल्यामुळे एका तरुण मुलाला प्रवेश देण्यात येणार नव्हता. ही गोष्ट जेव्हा आजोबांच्या कानावर आली त्यावेळेला त्यांनी ताबडतोब स्वत: निर्णय घेतला की हा जो मला कृत्रिम श्वास लावलाय तो मला माझ्या घरी सुद्धा लावता येणार आहे. पण या तरुण मुलाला इथे उपचार मिळणे जास्त गरजेचे आहे आणि ते आजोबा डॉक्टरांच्या परवानगीने घरी परतले. त्यांची ही कृती खूप जणांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली. आता वयाची अनेक वर्ष पार केलेली म्हातारी व्यक्ती जेव्हा तरुण मुलाला त्याचे आयुष्य जगू देण्यासाठी स्वत:चा मृत्यू स्वीकारते त्यावेळेला अशा माणसांना खरोखर मनोमन नमस्कार करावासा वाटतो. महाभारतात देखील अगदी मृत्यूच्या जवळ असलेला कर्ण जेव्हा वेदनांनी कासावीस होऊन रडत होता त्यावेळेला एक ब्राह्मण दान मागण्यासाठी कर्णाला शोधत तिथपर्यंत आला व झोळी पसरली. आपल्या दान देण्याने एखाद्या माणसाच्या आयुष्याचं भलं होणार असेल तर त्याला नक्की दिलं पाहिजे, हा संस्कार असलेला कर्ण त्या ब्राह्मणाला थांब म्हणाला. जवळच असलेल्या दगडावरती त्याने आपला चेहरा आपटला. त्याच्या दातांमध्ये दोन दात सोन्याचे होते ते सोन्याचे दोन दात त्याने ह्या ब्राह्मणाला दान म्हणून दिले. मला मृत्यू तसाही येणारच आहे पण ह्या दानामुळे तुझे आयुष्याचे क्षण आनंदी होतील असा विचार करणारे चंदनाचे झाड प्रत्येकाला होता आलं पाहिजे.
आपलं आयुष्य आपण जगतोच पण आपल्या आयुष्याचे काही क्षण दुसऱ्याचं आयुष्य उभं करण्यासाठी जर वापरात येणार असतील तर ते नक्की केलं पाहिजे. हीच गोष्ट आपल्याला चंदनाचे झाड देऊन जाते. असे संस्कार करणारे अनेक लोक आपल्या अवतीभवती असतात. फक्त त्यांच्या संपर्कात यायला हवं, त्यांना जाणण्याची दृष्टी मिळायला हवी, चंदनाचे गंध आपोआप येऊन बिलगतात आणि आयुष्याचं सोनं होतं.








