गोपाळ देसाई यांचे आवाहन : निवडणुकीतील पराभवानंतर कारणमिमांसा शोधण्यासाठी बैठक
खानापूर : पराभवाने खचून न जाता समिती कार्यकर्त्यांनी सीमाप्रश्नाची चळवळ पुन्हा तीव्रतेने उभारावी, न्यायप्रविष्ट असलेल्या सीमाप्रश्नात चळवळीचा भाग म्हणून निवडणुका लढविल्या जातात. यात जय-पराजयाचा विचार करू नये, पराभवातून नवी उभारी घेऊन सीमाचळवळीची तीव्रता कर्नाटक सरकारला दाखवून देवूया, कार्यकर्त्यांनी सीमाभागातील मराठी भाषा संस्कृतीसाठी पुन्हा झोकून देऊन काम करण्यास कटिबद्ध व्हावे, असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पराभवाची कारणमिमांसा शोधण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांनी समितीच्या विजयासाठी प्रामाणिकपणे योगदान दिले आहे. राष्ट्रीय पक्षाच्या आर्थिक तंत्रासमोर समितीच्या उमेदवाराची ताकद तोकडी पडली. त्यामुळे हा पराभव स्वीकारावा लागला. पराभव जिव्हारी लागला असला तरी कार्यकर्त्यांनी खचून न जाता सीमाचळवळीसाठी पुन्हा नव्याने लढाई उभारली पाहिजे, यासाठी तालुक्यातील मराठी भाषिकांनी सीमाचळवळीत सक्रिय व्हावे, असे ते म्हणाले. मुरलीधर पाटील म्हणाले, समितीचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी निवडणुकीचा किल्ला प्रामाणिकपणे लढविलेला आहे. राष्ट्रीय पक्षांनी मराठी भाषिकांची मते फोडण्यासाठी पैशांचा प्रचंड प्रमाणात वापर केलेला आहे. त्यामुळे आम्ही कमी पडलो. आमची लढाई तत्त्वाची असल्याने आम्ही सन्मानाने लढलेलो आहोत. समितीने माझ्यावर विश्वास दाखवून उमेदवारी दिली. त्यासाठी मी समितीशी कायम प्रामाणिक राहणार आहे. भविष्यात सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी कटिबद्ध आहे.
यावेळी डी. एम. गुरव म्हणाले, समितीचा हा पराभव मराठी भाषिकांच्या जिव्हारी लागला असून आत्मचिंतन करायला लावणारा आहे. मराठी भाषिक मते राष्ट्रीय पक्षाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात का वळली, याचे सखोल चिंतन व्हावे, तसेच मराठी भाषिकांच्या समस्या सोडविण्यासाठी समितीने कायम अग्रेसर राहून मराठी भाषिकांना न्याय द्यावा, यासाठी कायमस्वरुपी समितीचे कार्यालय खानापुरात करण्याची नितांत गरज आहे. माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई म्हणाले, सातत्याने तालुक्यातील मराठी भाषिक जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कायम पाठीशी राहणे गरजेचे आहे. आमच्याकडून चुका झाल्या आहेत. येणाऱ्या इतर निवडणुकात आम्ही नेटाने आमची भूमिका घेऊन जावूया. माजी अध्यक्ष विलास बेळगावकर म्हणाले, पराभवाने खचून न जाता समितीची चळवळ पुन्हा उभारून समितीला गतवैभव मिळवून देण्यासाठी मराठी भाषिकांच्या हक्काची लढाई लढलीच पाहिजे. उपाध्यक्ष कृष्णा कुंभार म्हणाले, गेल्या पाच वर्षांत आम्ही विरोधकाची भूमिका सक्षमपणे पार पाडलेली नाही. जर पुढील पाच वर्षात सक्षम विरोधकाची भूमिका पार पाडून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिल्यास निश्चित मराठी भाषिक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. यावेळी प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, सीताराम बेडरे, गोपाळ पाटील, महादेव घाडी, नारायण कापोलकर, रणजीत पाटील, कृष्णा मन्नोळकर, नारायण लाड, रमेश धबाले, शंकर गावडा, संजय पाटील, संतोष पाटील, डी. एम. भोसले, मारुती परमेकर, अमृत शेलार यासह इतर कार्यकर्त्यांनी विचार व्यक्त केले. समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









