महाराष्ट्र दिन आणि मराठी राजभाषा दिन आनंद व उत्साहात साजरा करण्याचे भाग्य महाराष्ट्राच्या भाळी यंदाच्या वषी नव्हतेच बहुतेक. इतिहासातील मढी उकरून त्यावर आक्रोश करण्यात महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी महाराष्ट्र दिनाचा दिवस सुद्धा वाया घालवला यासारखे दुर्दैव आणखी दुसरे कोणतेच नसावे. बाबरी मशीद कोणी पाडली याचा पाढा कोणी वाचला तर कोणी जुन्या काळातील गद्दारीची आठवण काढली तर कोणाचा भोंगा वाजतच राहिला. या सर्वांच्या कलकलाटात सर्वसामान्य मराठी माणसाचा आनंदाचा दिवस सुद्धा वाया गेला. हा दिवस मराठीचा. मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करण्याचा. पण कुसुमाग्रज यांच्या जयंतीला भाषा गौरव दिनाऐवजी राजभाषा दिवस साजरा करणारे बहुतांशी उत्सवप्रिय लोक खऱया राजभाषा दिनाला आणि मराठी राज्याच्या स्थापनेच्या दिनालाही विसरले. कदाचित आता त्यांच्यालेखी हा सण राहिला नसेल. या दिनाबाबतीतच्या त्या सर्वांच्या धारणा आता बोथट झाल्याही असतील. पण म्हणून त्यांनी जनतेच्या आनंदाला गालबोट लावायचे काहीही कारण नव्हते. हा एक आगळा वेगळा दिवस आहे. तो आगळय़ावेगळय़ा पद्धतीने लोकांच्या लक्षात राहावा असा साधा विचार एकाही राजकीय पक्षाच्या मनाला शिवला नाही. याचाच अर्थ जनतेला त्यांनी खूपच गृहीत धरले आहे. प्रत्येक गोष्टीकडे आणि क्षणाकडेसुद्धा राजकीय दृष्टीने पाहण्याची अत्यंत घाणेरडी सवय राज्यातील सर्व राजकीय पक्षांना झालेली आहे. आपण सर्वसामान्यांच्या भावनेवर घाव घालत आहोत, याची किंचितही कल्पना यापैकी कोणाला नसावी. साधे औचित्यही पळता येऊ नये, इतक्मया जर यांच्या जाणीवा बोथट झाल्या असतील तर ते या समाजाचे नेतृत्व करण्यास पात्र राहिलेले नाहीत, असेच समजावे लागेल. हा महाराष्ट्र केवळ दगडांचा आणि धोंडय़ांचा नाही तर प्रबोधनाची वाट दाखवणाऱयांचा, कर्तृत्ववानांचा महाराष्ट्र आहे. केवळ बोलघेवडय़ांचा नाही, याची जाणीव सर्वसामान्य मराठी माणसाने या सर्वांना जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. याच महाराष्ट्रात केशवसुतांनी नवविचारांची तुतारी फुंकली. त्या काव्याच्या प्रत्येक ओळी महाराष्ट्रातील राजकारण्यांनी पुन्हा पुन्हा वाचाव्यात आणि आपली सध्याची कृती त्याबरहुकूम ताडून पाहावी. एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकिन मी जी स्वप्राणाने, भेदुनि टाकीन सगळी गगने, दीर्घ तिच्या त्या किंकाळीने, अशी तुतारी द्या मजलागुनी….. अशी हाक देणारे केशवसुत या कवितेत कोणाला संदेश देत असतील? असा प्रश्न पडला तर तो आजच्या राजकारण्यांसाठी आहे असे मानायला हरकत नाही. अर्थात तो सर्व मराठी जनांसाठी असला तरी, जनतेच्या विचारापासून दूर दूर चाललेल्या राजकीय पक्षाच्या विविध स्तरातील नेत्यांना हा संदेश ओरडून सांगायची वेळ आली आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी उणीदुणी काढत हे लोक घोळ घालत बसले आहेत. महाराष्ट्रासमोर आणि देशासमोरची आव्हाने किती गंभीर आहेत, याचा विचार न करता, तात्कालिक बाबींना पुढे करून हे लोक कोणता संदेश देत आहेत? त्यांना सर्वसामान्यांच्या जगण्या, मरण्याची चिंता आहे का नाही? लोकांनी फक्त यांच्या राजकीय अजेंडय़ावर आपले डोके आपटून घ्यावे? असे त्यांना सातत्याने वाटत असते की काय. सामान्य माणसांच्या सामान्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करून त्यांना भलतीकडेच घेऊन जाण्याचे हे कावे महाराष्ट्र नक्की माफ करणार नाही. जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका, सडत न एक्मया ठायी ठाका, सावध! ऐका पुढल्या हाका, खांद्यास चला खांदा भिडवूनी…. प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा, निजनामे त्यावरती गोंदा, बसुनी का के वाढविता मेदा? विक्रम काही करा, चला तर….. असा हा संदेश देणारे केशवसुत. एकाच मुद्याजवळ सडत पडल्यासारखे जे अडून बसले आहेत अशांना पुढच्या आव्हानाची जाणीव करून देत आहेत. राजकीय नेते तावातावाने एकमेकावर जेव्हा तुटून पडले आहेत त्याच वेळी सूर्य आग ओकत आहे. घामाच्या धारांनी महाराष्ट्र बेचैन आहे. अनेकांसमोर जीवन-मरणाचे आव्हान उभे आहे. जितका कडक उन्हाळा तितकाच पावसाळा आणि हिवाळाही असेल का? आपला या वातावरणात टिकाव लागेल का? याची सर्वसामान्यांना भीती आहे. पण, त्यांच्या या भीतीचे कोणत्याही राजकीय पक्षांना सोयरसुतक नाही. ते भीती भलत्याच कारणांची घालत आहेत. आणि भलत्याच कारणांचा आग्रह धरत आहेत. अशा नकारात्मक बाबी करण्यासाठी ज्यांना भरपूर वेळ आहे अशा नेत्यांचा नागरिकांनी तरी सकारात्मक विचार का करावा? राज्या समोरची अनेक आव्हाने पेलण्याची शक्ती असणारे हे राजकीय नेते, एकमेकांची उणीदुणी काढण्यात उगाच वेळ वाया घालवत आहेत. लोकांनी ज्यांना निवडून दिले त्यांनी कायदेमंडळात बसून कायदे करावेत आणि कल्याणकारी राज्याच्या वाटचालीत आपले योगदान द्यावे ही जनतेची अपेक्षा.प्रत्यक्षात तेथे एकमेकाला अडवायचे आणि एकमेकाची जिरवायची अशा प्रकारचे राजकारण खेळले जात आहे. एखाद्या प्रश्नाबाबत रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे तर त्याऐवजी जनतेशी थेट संबंधित नसणाऱया विषयांना चघळत बसण्यात धन्यता मानावी वाटते. याचाच अर्थ आजच्या वास्तवाशी भिडण्याची त्यांची मानसिक तयारी नाही. त्यांना फक्त आपल्या मतांची चिंता आहे. त्या उद्यासाठी ते महाराष्ट्राचा ‘आज’ खराब करत आहेत आणि त्याची साधी जाणीवही त्यांना नाही. सर्वसामान्यांचे प्रश्न आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी कोणीही राजकीय पक्ष तयार नाही. त्यांची भांडणे भलत्याच कारणांसाठी लागली आहेत. आता तर ते एकमेकाच्या विरोधात न्यायालयात पोहोचले आहेत. न्याय देवतेचे पारडे आपल्या बाजूला झुकेल अशी दोन्ही बाजूंना खात्री आहे. त्यामुळे न्यायालयालाही स्वतः बाबत साशंक होईल असे त्यांचे वर्तन सुरू आहे. हे सुंदर लेणी खोदतील की महाराष्ट्राला अधिक विद्रुप करतील? याचा विचार जनतेनेच करायची वेळ आली आहे.
Previous Articleनवजात बाळाची विक्री प्रकरणी दोघा महिलांना अटक
Next Article इम्रानखानच्या ईदवर कारागृहाचे सावट ?
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








