काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचे आवाहन : पेडणेत काँग्रेसचे हाथ से हाथ जोडो अभियान
पेडणे / प्रतिनिधी
जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या भाजपच्या भ्रष्ट, जुमला सरकारला येत्या लोकसभा निवडणुकीत अद्दल घडवा, सत्तेपासून दूर ठेवा आणि काँग्रेसला हात द्या, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पेडणे येथे केले.
गोवा प्रदेश काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे हाथ से हाथ जोडो अभियान पेडणे मतदारसंघात श्री भगवती देवीला श्रीफळ ठेवून आणि साकडं घालून सुऊवात केल्यानंतर पत्रकारांशी पाटकर बोलत होते. यावेळी उत्तर गोवा काँग्रेस सचिव जितेंद्र गावकर, काँग्रेस प्रवक्ते संजय बर्डे, उत्तर गोवा अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, पेडणे गटाध्यक्ष कृष्णा नाईक, राजन म्हापसेकर, सुहास कामुलकर, प्रकाश किनळेकर, प्रकाश पिळर्णकर, संदीप कांबळी, राजेंद्र रेडकर, प्रमेश मयेकर, सिद्धेश मोरे, प्रशांत जाधव, यश्र्ररी गावंकर आदी यावेळी उपस्थित होते.
भाजप सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत असून गॅस, पेट्रोल आणि पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढलेल्या आहे. सर्व सामान्याचे कंबरडे भाजप सरकारने मोडून टाकलेले आहे. पेडण्याच्या आमदारांना पेडणेतील बेकार युवक दिसत नाहीत का? ते त्याना रोजगार देण्याचे सोडून सिंधुदुर्गचे भाजप पदाधिकारी राजन तेली यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांना भेट घेऊन सिंधुदुर्गातील लोकांना मोपा विमानतळ प्रकल्पावर रोजगार देण्याची भाषा बोलत आहेत. मात्र मोपा विमानतळावर पेडणेतील अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळत नाहीत. लोकांना निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने भाजप सरकार पाळत नाहीत. भ्रष्ट सरकारला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी जनतेला सुवर्णसंधी चालून आलेली आहे. जनतेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसला साथ द्यावी असे आवाहन यावेळी अमित पाटकर यांनी केले.
उत्तर गोवा अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर म्हणाले की, पेडणे मतदारसंघात विविध समस्या आहेत. रोजगार, पाण्याच्या समस्या आहे. वेळोवेळी निवडणुकीच्या दरम्यान लोक पाण्याचे टँकर देत होते मात्र आता पाण्यासाठी लोकांना नहक त्रास सहन करावा लागत आहे. या सरकारने पाण्यासाठी लोकांना रडवलेले आहे. हे सरकार भ्रष्टाचारयुक्त असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या सरकारला मतदान न करण्याचे आवाहन यावेळी वीरेंद्र शिरोडकर यांनी केले.
काँग्रेस प्रवक्ते संजय बर्डे म्हणाले की, ऍड. जितेंद्र गावकर, कृष्णा नाईक यांचीही जनजागृतीपर भाषणे झाली. यावेळी काँग्रेस पक्षातर्फे पेडणे बाजारपेठेत लोकांची भेट घेऊन त्यांना पत्रके वाटप करण्यात आले आणि जनजागृती केली.









