अध्याय पाचवा
c अनेक जन्मात अनुभवलेल्या इंद्रिय सुखामुळे साधकाचे मन समाधीसुखाचे महात्म्य सहजी मान्य करायला तयार नसते. वास्तविक पाहता क्षणभर मिळणाऱ्या इंद्रिय सुखापेक्षा कायम टिकणारे समाधीसुख कितीतरी उच्च दर्जाचे आहे. म्हणून साधकाला जेव्हा जेव्हा इंद्रियसुखाची आवड निर्माण होईल तेव्हा तेव्हा त्याने सावध रहावे. इंद्रियसुखाचा संकल्प करून कर्म करणारा स्वत:चा शत्रु होतो. पण त्यांची इच्छा न करता जो कर्म करतो तो योगी सिद्धि पावतो ह्या अर्थाचा इन्द्रियार्थांश्च संकल्प्य कुर्वन्स्वस्य रिपुर्भवेत्। एताननिच्छन्यऽ कुर्वन्सिद्धिं योगी स सिद्ध्यति ।। 3 ।। हा श्लोक आपण पहात आहोत.
इंद्रियसुख मिळावं म्हणून मनुष्य अनेक प्रयत्न करत असतो, त्यासाठी काही धार्मिक संकल्प करत असतो. नवससायास करत असतो कारण काय वाट्टेल ते करून ते आपल्याला मिळावं अशी त्याची इच्छा असते. त्यापाई त्याच्या हातून बऱ्याचवेळा धर्मबाह्य वर्तन घडतं. म्हणून कर्मयोग्यानं इंद्रिय सुखासाठी कोणतेही प्रयत्न स्वत:हून करू नयेत. ज्या गोष्टी नशिबात असतात त्या आपणहून त्याच्याकडे चालत येणार आहेत हे लक्षात ठेवावे आणि मन:स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी आहे त्यात समाधान मानावे. इंद्रिय सुखासाठीचे संकल्प व लोककल्याणकारी कर्मातून ठेवलेल्या मानमरातब आदि अपेक्षा न ठेवणारा योगारुढ कर्मयोगीच संन्यासी व्हायला पात्र असतो.
वर सांगितलेले कर्मयोगाचे तत्व लक्षात घेऊन मनुष्य कर्म करू लागला की, सभोवतालचे लोक, नातेवाईक काय खुळा आहे हा असं म्हणून त्याची चेष्टा करतात. असं वारंवार घडू लागलं की, कधीकधी कर्मयोगी व्यक्तीही गोंधळते. त्यामुळे त्यालाही एखाद्या कर्मातून काही अपेक्षा निर्माण होऊ शकते पण ध्येयनिष्ठ कर्मयोगी व्यक्तीनं अशी अपेक्षा वाटल्याक्षणी ती अंगावरील मुंगी झटकावी तशी झटकून टाकली पाहिजे आणि आहे त्यात समाधानी राहायला शिकलं पाहिजे. असं झालं की, अपेक्षांचे पंख आपोआप कापले जातात. कर्मयोग्यांनी त्यांच्या हातून घडत असलेलं काम हे ईश्वरी कार्य असून ईश्वर त्याच्याकडून जेव्हढं कार्य करून घेणं अपेक्षित आहे तेव्हढं करून घेत असतो. मग मी एव्हढं करीन तेव्हढं करीन असं म्हणण्याला काहीच अर्थ नाही.
तरीही माणसाचे मन संकल्प केल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून त्याला सावध करण्यासाठी पुढील श्लोकाची रचना व्यास महर्षीनी केलेली आहे. त्यानुसार वैयक्तिक नाही पण लोककल्याणकारी कार्यासाठी केलेल्या संकल्पाच्या पूर्तीसाठी मनुष्य झटू लागतो. समजा एखाद्याने गरीब मुलांच्यासाठी शाळा काढायचे ठरवले. त्याप्रमाणे त्याने केलेला संकल्प पूर्ण झाला तर त्या पूर्तीतून आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं, मान द्यावा अशा अपेक्षाही डोकं वर काढतात. तसेच काहीवेळा संकल्प आणि पूर्तीत अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यांच्या निवारणाचा मनुष्य जसजसा विचार करतो तसतसे त्या अडथळ्यांच्या अनुरोधाने त्याच्या मनात मित्रत्व, शत्रुत्व, उध्दार, बंधन आदि विचार येऊ लागतात.
सुहृत्वे च रिपुत्वे च उद्धारे चैव बन्धने ।
आत्मनैवात्मनो ह्यात्मा नात्मा भवति
कश्चन ।। 4।।
अर्थ- मित्रत्व, शत्रुत्व, उद्धार अथवा बंधन होण्याला जो तो स्वत:च कारण असतो, दुसरा कोणी नसतो.
ह्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात पुढील भागात.
क्रमश:








