वायुउपप्रमुखांचे ‘सिंदूर अभियाना’संबंधी वक्तव्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘सिंदूर अभियाना’च्या अंतर्गत पाकिस्तानची प्रचंड हानी करताना, भारताने 50 हून कमी शस्त्रांचा उपयोग केला होता, अशी माहिती भारताच्या वायुदलाचे उपप्रमुख नर्मदेश्वर तिवारी यांनी दिली आहे. पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा सूड उगविण्यासाठी हे अभियान हाती घेतले आहे. ते अद्यापही थांबलेले नाही. या अभियानात भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ तसेच पाकिस्तानचे किमान 11 वायुतळ आणि लष्करी आस्थापने नष्ट केली होती. त्यासंबंधी तिवारी हे भाष्य करीत होते.
भारताने या सशस्त्र संघर्षात कमीतकमी शस्त्रे उपयोगात आणली आहेत. आम्ही केवळ 50 हून कमी शस्त्रास्त्रांमध्ये पाकिस्तानवर पूर्णपणे वर्चस्व मिळविले होते. आम्ही पाकिस्तानच्या अशा काही आस्थापनांवर हल्ला चढविला, की ज्यांच्यावर 1971 च्या युद्धमध्येही हल्ला करण्यात आला नव्हता. आमच्या प्रत्येक अस्त्राचे लक्ष्य अचूक होते. प्रत्येक अस्त्र आणि शस्त्र अशाप्रकारे डागण्यात आले, की त्याने पाकिस्तानची जास्तीत जास्त हानी केली. यामुळे आमचे योजनाकार आणि योजनांचे कार्यान्वयक यांची बिनतोड क्षमता सिद्ध झाली आहे. केवळ चार दिवसांमध्ये आम्ही पाकिस्तानला शस्त्रसंधीची याचना करण्यास भाग पाडले, अशी वस्तुस्थिती तिवारी यांनी यावेळी या अभियानासंदर्भात बोलताना स्पष्ट केली.
संघर्ष चिघळविण्याची नव्हती योजना
हा संघर्ष काही मर्यादित उद्दिष्टांसाठी होता. तो वाढविण्याची भारताची इच्छा नव्हती. केवळ चार दिवसांमध्ये आम्ही पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली आहे. आमचा हेतू केवळ पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उध्वस्त करणे, हाच होता. आम्ही आधी अनेक दहशतवादी तळांची सूची सज्ज केली होती. तथापि, नंतर ही सूचीला लघुस्वरुप देण्यात येवून केवळ 9 मोठ्या दहशतवादी तळांची निवड करण्यात आली. भारताच्या वायुक्षेत्रात राहूनच आम्ही पकिस्तानातील आमच्या लक्ष्यांवर अचूक मारा करुन त्यांना नष्ट केले. केवळ पाकिस्तानातील लष्करी तळांवर मारा करण्यात आला. त्यांच्या नागरी वस्त्यांची हानी करण्यात आली नाही. भारताचे तसे धोरण होते, असेही प्रतिपादन तिवारी यांनी केले.









