कोल्हापूर / इम्रान गवंडी :
प्रभावी उपाययोजना आणि जनजागृतीने याचा प्रसार शुन्यावर येणे शक्य आहे. त्या दृष्टीने सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालय व जिल्हा प्रशासनाने गावागावात, घराघरात सर्व्हेक्षण, जनजागृती सुरू केली आहे. जिल्ह्यात 167 नवीन कुष्ठरूणांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 30 जानेवारीला कुष्ठरोग निवारण पंधरवडा सुरू झाला आहे. त्याची सांगता 13 फेब्रुवारीला होत आहे.
कुष्ठरोग निवारण दिन दरवर्षी 30 जानेवाराला होतो. कुष्ठरोग निवारण पंधरवड्यात कुष्ठरोगाशी संबंधित गैरसमज, उपचाराविषयी जनजागृती केली जात आहे. ग्रामपंचायत, शाळा, शासकीय रूग्णालये, सामाजिक संस्था, मंडळे, महिला मंडळे, आशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रॅली, प्रतिज्ञा वाचन, नुक्कड नाटीका, दवंडी, कार्यशाळासारखे उपक्रम राबवून कुष्ठरोग निवारणासाठी जनजागृती केली जात असल्याचे सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. हेमलता पालेकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात गतवर्षी 9 महिन्यांत 167 नवीन कुष्ठरूग्ण आढळले. त्यांना मोफत औषधोपचार केले आहेत. त्यांच्या परिवार व सहवासातील नागरिकांची तपासणी करून प्रतिबंधात्मक उपचार केले आहेत. 2027 पर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार शुन्य टक्क्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी यंत्रणे मार्फत काम सुरू आहे.
यासाठी आशा सेविका व आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्व्हेक्षणाने संशयित कुष्ठरूग्ण शोधत आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत खात्री करून उपचार केले जात आहेत. संशयित रूग्ण सापडल्यास त्याच्या संपर्कातील 50 जणांची तपासणी केली जात आहे. 100 घरांचे सर्वेक्षण केले जात आहे.
उपचाराने कुष्ठरोग बरा होणारा आजार आहे. सध्याच्या उपचार पद्धतीमध्ये तीन औषधांचा समावेश आहे (डॅप्सोन, रिफाम्पिसिन आणि क्लोफॅझिमिन) याला मल्टी–ड्रग थेरपी (श्अ) असे संबोधले जाते. कुष्ठरोगामध्ये सांसर्गिक, असांसर्गिक असे प्रकार आहेत. यामध्ये वर्गीकरण करून 6 व 12 महिने कालावधीची उपचार पद्धती अवलंबली जाते.
- वेळीच उपचाराने धोका टळतो
प्रामुख्याने त्वचा, त्वचेजवळील नसांवर हे जंतू परिणाम करतात. त्यामुळे त्वचेचे व्रण, मज्जातंतूंचे नुकसान आणि स्नायू कमकुवत होतात. त्यावर उपचार न केल्यास, लक्षणीय अपंगत्व होऊ शकते. त्यामुळे लक्षणे दिसताच तत्काळ उपचाराचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.
- लक्षणे
अंगावर फिकट, लालसर रबधीर चट्टा
त्वचेवर गाठी, न दुखणारी जखम
कानाच्या पाळ्या जाड होणे,
भुवयांचे केस विरळ होणे
हातापायात सतत मुंग्या येणे
त्वचा गुळगुळीत, तेलकट, चमकदार होणे
- संक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न
कुष्ठरोगाचा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्याचा धोका असतो. असांसर्गिक ही पहिली स्टेज असते. याचा जंतूंचा संसर्ग झाल्यानंतर साधारण तीन वर्षांनी याची लक्षणे दिसतात. संसर्गिक स्टेज निर्माण झाल्यानंतर याचे धोके अधिक असतात. त्यामुळे पहिल्या स्टेजमध्येच उपचार घेतल्यास याचे संक्रमण रोखले जाऊ शकते. त्यादृष्टीने रूग्ण शोधून संक्रमण रोखण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. हेमलता पालेकर, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग)
- तीन वर्षातील रूग्णसंख्या
वर्ष नवीन रूग्ण
2022-23 : 220
2023-24 : 227
एप्रिल ते डिसेंबर : 167








