प्रतिनिधी/ बेळगाव
हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात ‘स्पर्श : कुष्ठरोग जागृती अभियान-2023’ निमित्त जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार व जिल्हा कुष्ठरोग नियंत्रण अधिकारी डॉ. चांदनी देवडी आदींच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कृष्णकुमार म्हणाले, कारागृहात 900 कैदी आहेत. यापैकी कोणालाही कुष्ठरोगाची लक्षणे आढळून आल्यास लपवून न ठेवता डॉक्टरांकडून उपचार करवून घ्यावेत.
यावेळी डॉ. चांदनी देवडी म्हणाल्या, कुष्ठरोग हा पुरातन काळापासून आहे. याविषयी बऱ्याच अंधश्रद्धा आहेत. 1985 मध्ये कुष्ठरोगावर औषधे शोधण्यात आली. त्यानंतर सतत जागृती अभियान राबविल्यामुळे कुष्ठरुग्णात घट झाली आहे.
कारागृहाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश नागरबेट्ट म्हणाले, आधुनिक युगात प्रत्येक जण तणावाखाली वावरतो आहे. आरोग्य हेच भाग्य, हे साध्य करायचे असेल तर तणावमुक्त जीवन जगले पाहिजे. यावेळी कारागृहाचे साहाय्यक अधीक्षक शहाबुद्दीन के., जेलर राजेश धर्मट्टी, सहना राजेश्वरी, मारिहाळ व कलीमुल्ला आदी उपस्थित होते.









