वार्ताहर/ एकंबे
कोरेगाव तालुक्यातील सातारारोड परिसरात कल्याणगड डोंगरावर बिबटय़ांचा वावर असल्याचे रविवारी निदर्शनास आले. पवनचक्क्यांसाठी बनवलेल्या रस्त्यावर दोन बिबटे उन्हात बसल्याचे वाहन चालकाच्या निदर्शनास आले. त्याने तातडीने ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी कळवल्यानंतर वन विभागाने त्याची खातरजमा केली. परिसरातील ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांनी केले आहे.
कल्याणगड परिसरात खेड-बर्गेवाडी फाटय़ापासून डोंगर माथ्यावर पवनचक्की बसवणाऱया कंपन्यांनी डोंगरामध्ये घाट रस्ता तयार केला असून तो रस्ता खडखडवाडी आणि कोलवडीच्या माथ्यापर्यंत जातो, तसेच एक रस्ता कल्याणगडावरील मंदिर परिसरात जातो. या रस्त्यावर पवनचक्कीशी निगडीत वाहतूक दररोज सुरू असते. रविवारी एका वाहन चालकाला भर रस्त्यावर दोन बिबटे ठाण मांडून असल्याचे दिसून आले. त्याने आपले वाहन थांबविले, आपल्या सहकायासह बिबटय़ांची छायाचित्र काढली. ही छायाचित्रे त्याने व्हाट्सअपद्वारे ग्रामस्थांना पाठविली.
ग्रामस्थांनी वन विभागाला बिबटय़ांच्या वावराची माहिती दिली. वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांनी वनपाल तानाजी मोहिते, एस. एस. निकम व वन रक्षक व्ही. बी. नरळे यांना तात्काळ घटनास्थळी पाठविले. त्यांनी बिबटय़ांच्या पावलांचे ठसे पाहिले. एकूणच या परिसरात बिबटय़ांचा वावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात माहिती देताना वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांनी सांगितले की, पळशी वनक्षेत्रात कोलवडी गावच्या हद्दीत बिबटय़ांचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामस्थांनी भयभीत न होता खबरदारी घ्यावी. बिबटय़ा हा रात्रीच्या वेळी सक्रिय असतो, त्यामुळे शेतकयांनी रात्रीच्या वेळी एकटे शेतात जाणे टाळावे. पाळीव प्राण्यांना सुरक्षित व बंदिस्त ठिकाणी ठेवावे, दरवाजे व्यवस्थित लावून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.