प्रतिनिधी/ कारवार
शिकार (जंगली मांजर) आणि शिकारी (बिबट्या) विद्युतस्पर्शाने ठार झाल्याची घटना शनिवारी शिरसी तालुक्यातील बेळगनमने येथे घडली. ठार झालेला बिबट्या सुमारे तीन ते साडेतीन वर्षांचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अलीकडच्या काळात कारवार जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी कुत्री व कोंबड्या आदींच्या शिकारीसाठी बिबटे लोकवस्ती प्रदेशात दाखल होण्याच्या घटना वरचेवर घडत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी शिरसी तालुक्यातील बेळगनमने येथे बिबटा आहाराच्या शोधासाठी दाखल झाला. जंगली मांजर दृष्टीस पडल्याने बिबट्याने त्याचा पाठलाग सुरू केला. मांजर आपला जीव वाचविण्यासाठी विद्युतखांबावर चढले आणि विद्युतवाहिनीच्या स्पर्शाने मांजराचा मृत्यू झाला. विद्युतखांबावर चढलेल्या बिबट्याचाही विद्युतवाहिनीला स्पर्श झाला आणि मांजराला भक्ष्य करण्यापूर्वीच बिबट्याही जीव गमावून बसला. या घटनेची माहिती मिळताच हेस्कॉम आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान वन्यप्राण्यांचा प्राण गेल्याने शिरसी तालुक्यातील पर्यावरणप्रेमींतून हळहळ व्यक्त होत आहे.









