वंदूर प्रतिनिधी
वंदूर ता. कागल मध्ये खोडवे ,आवळीचा वडा ते जंगटे मळा परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक व शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण पसरले आहे.वंदूर येथील शेतकरी शिवाजी मल्लू पाटील हे नेहमीप्रमाणे सकाळी नऊच्या सुमारास गुरांना चारा आणण्यासाठी शेतामध्ये गेले होते. त्यांना सागवानच्या झाडावरती बिबट्या सदृश्य प्राणी असल्याचे दिसले ते घाबरले.त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत ही माहिती वंदूर मधील नागरिकांना सांगितली. बिबट्याने भुंकणाऱ्या कुत्र्यांवर हल्ला केला होता. त्याने दोन कुत्र्यांना शेतात फरपटत नेले होते. ही माहिती वनविभाग, कागल पोलिसांना व करनूर येथील सह्याद्री डिझास्टर रेस्क्यू फोर्सला सांगितली. रेस्क्यू फोर चे अनिल ढोले व विकास चव्हाण यांनी घटनास्थळी गेल्यानंतर त्यांनी बिबट्याचे ठसे, झाडावरील नख्यांचे ओरखडे पाहिले व त्यांना बिबट्या निदर्शनास आला. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांनी वन विभागाला माहिती कळवली. यावेळी वन विभागाचे वन्यजीव बचाव पथक वन विभाग कोल्हापूरचे प्रदीप सुतार, मतीन बांगे यांनी ड्रोन द्वारे बिबट्याची पाहणी केली. तो जवळपास निदर्शनास आला नाही. तो बिबट्या सुमारे दोन ते अडीच वर्षाचा असल्याचे व तो कोगील परिसरात आढळल्यालाच बिबट्या असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाऊ नये, जाताना सावधगिरी बाळगा असे आव्हान वंदूर , करनूर येथील ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे. बिबट्या सारख्या प्राण्याचे दर्शन झाल्याने वंदूर , करनूर सहभागात भीतीचे वातावरण पसरले आहे. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे, वनविभाग करवीर, कोल्हापूर चे सागर पांढरे वनरक्षक, मारुती वाघवेकर, बाबासो जगदाळे, राहुल झोनवाल हे वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
यावेळी आम्ही रेस्क्यू टीम पाठवून शोध घेतला. ड्रोन च्या माध्यमातून त्याचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला येथून तो दुसऱ्या जागी सरकला आहे तो पुढे निदर्शनास आला तर त्वरित वन विभागाला संपर्क करा पुढील कार्यवाही त्याला मनुष्य वस्ती पासून दूर ठेवण्याचं काम आम्ही करू. लोकांनी अशा प्राण्यांपासून लांब राहावे तो वन्य प्राणी आहे त्याची वाट आपण आडवू तर तो वाट करण्याच्या उद्देशाने जाताना कोणाला इजा करू शकतो तो सुरक्षित जाण्यासाठी एखाद्याला जखमी करू करून जाऊ शकतो. त्याच्या मागे लागू नये तो असेल तिथे जाऊ नये व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी’,असं वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे म्हणाले आहेत.