पन्हाळा प्रतिनिधी
पन्हाळा-पावनगड दरम्यान असलेल्या रेडेघाट जंगल मार्गावर आज सायंकाळी पावणे सातच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
रेडेघाट येथे मोठे जंगल क्षेत्र आहे. मागील काही दिवसापासून या ठिकाणी बिबट्याचे दर्शन हे अधून मधून ठरल्यासारखेच आहे. पण आज पावनगड येथील रहिवासी असलेले आसिफ मुजावर हे कामावरून परत आपल्या घरी पावनगड कडे जात असताना रेडेघाट येथील रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी या बिबट्याला आपल्या मोबाईलच्या कॅमेरा कैद करत त्याचा व्हिडिओ केला आहे. तरी सदरचा बिबट्या हा पूर्ण वाढ झालेला असून अंदाजे सहा फूट लांब आणि साडेचार फूट उंच असल्याचे प्रत्यक्षदर्शी आसिफ मुजावर यांनी सांगितले. तरी पन्हाळा सह आसपासच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी वन विभागाने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी पावनगड ,पन्हाळा सह परिसरातील नागरिकांच्यातून होत आहे.








