कोयनानगर :
कोयना प्रकल्प वसाहतीमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे, परंतु संबंधित अधिकारी हा विषय गांभीर्याने घेत नाहीत. बिबट्याचा बंदोबस्त करण्याचे काम सोडून नको ते सल्ले वन्यजीव विभागाचे अधिकारी देत असल्याची तक्रार नंदकुमार सुर्वे यांनी केली आहे. येथील जनतेत भीतीचे वातावरण असल्याने वेळीच यावर उपाययोजना न केल्यास वनविभागाला होणाऱ्या परिणामास सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले.
कोयना विभागात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य प्राणी जखमी होत आहेत तर शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. कोयनानगर येथील प्रकल्प वसाहतीमध्ये व एमएसईबी कॉलनीमध्येही बिबट्याचा वावर वाढला आहे. जनतेत भीतीचे वातावरण असताना कुत्री आहेत तोपर्यंत बिबट्या येणार, तुम्ही कुत्र्यांचा बंदोबस्त करा बिबट्याचा वावर बंद होईल, असा अजब सल्ला वाइल्ड लाईफ व वन्यजीव विभागाचे अधिकारी देत असल्याचे येथील जनतेतून बोलले जात आहे. रात्री बिबट्या दिसला की आम्हाला फोन करा, आम्ही गस्तसाठी १० मिनिटात कर्मचारी पाठवितो, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. मात्र फोन केला असता कोणीच उचलत नाही, अशीही खंत स्थानिकांनी व्यक्त केली. जनतेत नाराजीचा सूर असून याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एखादी व्यक्ती दगावल्यास संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही होत आहे.
- अधिकाऱ्यांना किंमत मोजावी लागेल
एखाद्या लहान मुलावर किंवा माणसावर बिबट्याने हल्ला केला आणि त्यात जीवित हानी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागणार आहे. दोन दिवसांत योग्य उपाययोजना नाही केली, तर त्याची किंमत संबंधित अधिकाऱ्यांना मोजावी लागेल.
– नंदकुमार सुर्वे, अध्यक्ष, भाजपा पाटण तालुका
- अधिकाऱ्यांकडून केवळ सल्ले
कोयना प्रकल्प वसाहतीमध्ये बिबट्याचा वाढता वावर अतिशय गंभीर आणि तातडीने लक्ष घालण्याचा विषय आहे. परंतु वन्यजीव विभागाचे अधिकारी गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे, जे अतिशय दुर्दैवी आहे. बिबट्याच्या धोक्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकारी केवळ सल्ले देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करत नसल्याचे स्पष्ट आहे.
-मयूर देसाई, व्यावसायिक
- … तर अधिकाऱ्यांना कोंडू
कुत्र्यांचा बंदोबस्त करा, बिबट्या आपोआप जाईल हा अधिकाऱ्यांचा सत्ला जबाबदारी झटकण्यासारखा आहे. ‘रात्री बिबट्या दिसला की फोन करा, १० मिनिटात कर्मचारी येतील हा उपाय अपुरा आहे. आमची कुत्री घरात बंद करतो. पण तरी सुद्धा बिबट्या आला तर अधिकाऱ्यांना कोंडून ठेवावे लागेल.
-अजिंक्य डवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, एमएसईबी कॉलनी








