राधानगरी,महेश तिरवडे
राधानगरी अभयारण्य क्षेत्रात असलेल्या हसणे पैकी तांबेवाडी येथे असलेल्या मानवीवस्तीमध्ये काल रात्री साडे नऊच्या सुमारास यशवंत वासुदेव कांबळे यांच्या घरात मांजराच्या माग घेत बिबट्या घुसला. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे घरातील असलेल्या लोकांची भंबेरी उडाली. कुटुंबातील लोकांनी जोरदार आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने धूम ठोकली.घरातच बिबट्या घुसल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
काल सकाळी डेअरीला दूध घालायला गेलेल्या काही लोकांना या बिबट्याचे दर्शन झाले होते. प्राण्यांचा मानवीवस्तीत वावर वाढल्याने सर्व सामान्य माणूस भीतीच्या छायेखाली जीवन जगत आहे. अभयारण्य क्षेत्रात शेती कशी करायची असा प्रश्न गावकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. एका बाजूला गवा रेड्याच्या उपद्रव तर दुसऱ्या बाजूला बिबट्याची दहशत आहे.
दरम्यान, वन्यजीव विभागाशी संपर्क केला असता या गावात वनविभागाची एक टीम गस्त घालण्यास गेली असल्याची माहिती मिळाली. वनपाल एस. एस. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक राहुल पाटील, वनमजुर गुरुनाथ गुरव, रामदास तेली, महादेव पाटील आदी कर्मचारी या गस्त पथकात सहभागी झाले आहेत.मानवीवस्तीत जंगली जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









