शेतकरी, महिलेला दर्शन : भीतीचे वातावरण वन खात्याच्या अधिकाऱयांकडून पाहणी
वार्ताहर / किणये
मंडोळी परिसरात बिबटय़ा सदृश प्राणी दिसला असल्यामुळे भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी सकाळी गवत आणण्यासाठी गेलेल्या कल्लाप्पा साळवी यांना व गुरुवारी सकाळी मोरारजी देसाई शाळेजवळ एका महिलेला बिबटय़ा सदृश प्राणी दिसला असल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
मंडोळी गावापासून अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या शिवारात बुधवारी सकाळी कल्लाप्पा साळवी हे जनावरांसाठी ओला चारा आणण्यासाठी गेले होते. गवत कापून झाल्यानंतर डोक्मयावरती गवताचा भारा त्यांनी घेतला होता. त्यानंतर काहीतरी आवाज आल्यामुळे त्यांनी वळून पाहिले असता त्यांना बिबटय़ा सदृश प्राणी दिसल्याचे साळवी यांनी सांगितले.
त्यानंतर आपण त्या ठिकाणी जोराचा ओरडा केला. यानंतर अन्य एकालाही तो दिसला. भवानीनगर परिसरात मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिकही त्या ठिकाणी जमले. तोपर्यंत त्या प्राण्याने पलायन केले होते, अशी माहिती कलाप्पा साळवी यांनी दिली आहे.
सदर भागात वन खात्याच्या अधिकाऱयांनी पाहणी केली. मात्र बिबटय़ा सदृश प्राण्याचा कोणताच सुगावा लागला नाही.
तरीही त्या परिसरात बुधवारीच सापळा लावण्यात आलेला आहे.
गेल्या वीस दिवसांपूर्वी बेळवट्टी भागात बिबटय़ा दिसला होता. याचबरोबर त्यानंतर बिजगर्णी परिसरातही एका शेतकऱयाच्या निदर्शनास बिबटय़ा आला होता. त्यामुळे बेळवट्टी, बिजगर्णी भागातील शेतकरी बिबटय़ाच्या भीतीखाली वावरत असतानाच पुन्हा मंडोळी भागात बिबटय़ा सदृश प्राणी दिसला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
मंडोळी गावातील मोरारजी देसाई शाळेजवळ एका महिलेला व विद्यार्थ्याला गुरुवारी सकाळी बिबटय़ा सदृश प्राणी दिसला. यामुळे गावात चर्चा सुरू झाली. वन खात्याचे अधिकारी गावात दाखल झाले. त्यांनी मोरारजी देसाई शाळा परिसराची पाहणी केली.
बिबटय़ा सदृश प्राणी दिसलेल्या महिलेकडे आपण विचारणा केली. मात्र नेमका बिबटय़ाच आहे की अन्य प्राणी आहे त्याचा अद्याप सुगावा लागलेला नाही. मोरारजी देसाई शाळेच्या ठिकाणी दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. तसेच ज्या शेतकऱयाला बिबटय़ा सदृश प्राणी दिसला त्या भागातही सापळा लावण्यात आलेला आहे, अशी माहिती वनखात्याचे अधिकारी जालसिंग रजपूत यांनी दिली.
मंडोळी ग्राम पंचायत अध्यक्ष अश्विनी संतोष तळवारकर, वन खात्याचे अधिकारी मल्लिनाथ कुसनाळ, रमेश गिरप्पन्नवर, रजपूत, राहुल बोंगाळे आदींसह वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे सीपीआय श्रीनिवास हंडा आदींनी मंडोळी परिसराची पाहणी केली.
सदर प्राणी हा नेमका बिबटय़ाच आहे की नाही? हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे गावातील नागरिकांनी भीती बाळगू नये. तसेच मोरारजी देसाई व मंडोळी भागातील त्या डोंगराळ शिवारात जाताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन ग्राम पंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.









