घराजवळील कुत्र्यांना पळविले : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, सतर्क राहण्याचे आवाहन
वार्ताहर /किणये
कर्ले गावाजवळील जंगल परिसरात गेल्या तीन दिवसांपासून बिबट्या सदृश प्राण्याचा वावर वाढला आहे. कर्ले येथील वाल्मिकी गल्लीतील घराजवळ बांधलेल्या कुत्र्यावर सदर बिबट्या सदृश प्राण्याने हल्ला करून त्याला जंगल परिसरात ओढत नेल्याची माहिती मोहन तलवार यांनी दिली. त्यांच्या शिवारात व घराजवळ त्या प्राण्यांच्या पायाचे ठसे निदर्शनास आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोहन तलवार यांच्या घराजवळील कुत्र्यावर बिबट्या सदृश प्राण्याने हल्ला केल्याने गावातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी मध्य रात्रीच्या सुमारास बिबट्या सदृश प्राण्याने कुत्र्यावर हल्ला करून त्याला फरफटत डोंगराच्यादिशेने नेण्यात आले. सकाळी तलवार यांनी उठून पाहिल्यानंतर दारासमोर कुत्रा नाही. त्यांनी कुत्र्याला फरफटत नेलेले जमिनीवरील निशाण पाहिले आणि त्यांना बिबट्या सदृश प्राण्यांच्या पायाचे ठसेही दिसले. त्यांनी किणये भागातील वनखात्याचे गार्ड रवी गजप्पन्नावर यांना बोलावून घेतले.
सदर वनखात्याच्या गार्ड व नागरिकांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी सदर प्राण्याच्या पायाच्या ठशांचे छायाचित्र तपासण्यासाठी वनखात्याच्या अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आलेले आहे. त्याचा अद्याप तपास सुरू आहे. मात्र सदर प्राण्याचे ठसे बिबट्याचे असल्याचा संशय गार्ड रवी यांनी व्यक्त केला आहे. तसेच गावातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी शेत शिवाराकडे जाताना सतर्कता बाळगावी, असेही सांगितले. मोहन तलवार यांच्या शिवारात पुन्हा बुधवारी सायंकाळी अन्य एका शेतकऱ्याला बिबट्या सदृश प्राण्याचे ठसे दिसले आहेत. कर्ले गाव हे डोंगर पायथ्याशी आहे. इथल्या लोकांची बहुतांश प्रमाणात शेती या डोंगरपायथ्याशी आहे. त्यामुळे रोज शेतशिवारात जावेच लागते. मात्र तीन दिवसांपासून या भागात बिबट्या सदृश प्राणी आला असल्याची चर्चा सुरू असल्यामुळे सारेजण भयभीत झाले आहेत. ज्या श्वानावर हल्ला करण्यात आला त्याचा मृतदेह वनखात्याच्या अधिकाऱ्यांना सापडलेला नाही. या बिबट्या सदृश प्राण्याचा वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.









