नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : वन खात्याकडून शोधमोहीम सुरू
बेळगाव : अनगोळ येथील संतमीरा शाळेच्या मागील बाजूस बिबट्यासदृश प्राण्याच्या पायाचे ठसे निदर्शनास आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पाहणी करून बंदोबस्त लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संतमीरा शाळेच्या मागील बाजूस असणाऱ्या मोकळ्या जागेत बिबट्यासदृश प्राण्याच्या पायाचे ठसे नागरिकांच्या निदर्शनास आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. याची माहिती वन अधिकाऱ्यांना देण्यात आली. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता सदर ठसे बिबट्याचे नसल्याचे स्पष्ट केले. मात्र स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सांगण्यात येत आहे. बिबट्याने कुत्र्यांना फस्त केल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यावरून वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी परिसरात शोधमोहीम राबविली. तसेच खबरदारी म्हणून सापळेही रचले आहेत. तर वन खात्याच्या कर्मचाऱ्यांचीही परिसरात नेमणूक करण्यात आली आहे. सदर घटना समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे.
यापूर्वी रेसकोर्स मैदान येथे बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे तब्बल महिनाहून अधिककाळ शोधमोहीम राबविण्यात आली होती. शोधमोहिमेसाठी प्रशिक्षित हत्ती आणण्यात आले होते. बिबट्या दोनवेळा नागरिकांच्या निदर्शनास आला होता. शोधमोहिमेदरम्यान शार्पशुटर्सच्या डोळ्यांसमोरून बिबट्याने उडी मारून रेसकोर्स मैदान परिसरात धूम ठोकली होती. त्यानंतर बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले होते. शोधमोहीम राबवूनही बिबट्या हाती लागला नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना भीतीच्या छायेखाली वावरावे लागत होते. मात्र त्यानंतर पुन्हा बिबट्या निदर्शनास आला नाही. यामुळे नागरिक निर्धास्त झाले आहेत. येथील बिबट्या गेला कोठे? असा प्रश्न अद्यापही नागरिकांमधून उपस्थित केला जातो. सध्या अनगोळ परिसरात पुन्हा बिबट्याच्या पायाचे ठसे निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.









