वार्ताहर/गुंजी
कामतगा येथील जंगलात भर दिवसा एका बिबट्याने कुत्र्याला तोंडात घेऊन जाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांत घबराट पसरली आहे. येथील शेतकरी आपल्या वाटराजवळील शेताकडे जंगलातून जाताना त्याला सदर बिबट्या दिसला. त्यामुळे त्याने आरडाओरड करताच कुत्रा टाकून बिबट्या पसार झाला. काहींनी त्या ठिकाणी मोबाईल कॅमेरा लावून सदर बिबट्या आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. सध्या अनेक शेतकरी पिकांच्या संरक्षणासाठी शेतात कुत्रा बांधतात मात्र बिबट्याकडून अनेक वेळा कुत्र्याचा फडशा पाडला जातो याआधीही शिंपेवाडी, भालका या ठिकाणी बिबट्याने कुत्र्यांचा फडशा पाडला आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्या कामतगा येथील भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे या परिसरातील शेतकरी आणि नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.









