देवरुख :
नजीकच्या साडवली कासारवाडी येथे भरवस्तीत बुधवारी सकाळी बिबट्याने ‘एन्ट्री’ केली. ६ तास बिबट्या या परिसरात घुटमळत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. सहा तासाने वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. तो आजारी असल्याने बिबट्या परिसरात फिरत असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.

साडवली कासारवाडी येथील राजन धने यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस सकाळी ९.३० वा. बिबट्या दिसला. हा.. हा म्हणता ही बातमी वाऱ्यासारखी साडवलीत पसरली. परिसरात हा बिबट्या घुटमळत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. याची खबर पोलीस पाटील अनुसया डोंगरे यांनी वनविभागास दिली. देवरुख पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. चिपळुणात वनविभागाचा कार्यक्रम असल्याने सर्व अधिकारी, कर्मचारी त्या ठिकाणी असल्याने त्यांना देवरुख येथे येण्यास विलंब झाला. बिबट्या असल्याची महिती मिळताच त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांची, मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी गर्दी केली होती. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी येईपर्यंत ग्रामस्थ या बिबट्यावर नजर ठेवून होते. दुपारी ३ च्या सुमारास वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी पिंजरा घेवून घटनास्थळी दाखल झाले. अन् बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम सुरू झाली. काही मिनिटाच जाळे टाकून सुरक्षित बिबट्याला ताब्यात घेण्यात आले.
बिबट्याची सहाय्यक पशुवैद्यकीय आयुक्त युवराज शेट्ये व कोल्हापूर येथील वन्यजीव पशुवैद्यक संतोष वाळवेकर यांनी वैद्यकीय तपासणी केली. बिबट्याच्या डाव्या पायाच्या मांडीला जखम असल्याचे दिसले. तापामुळे हा बिबट्या अशक्त झाल्याचे डॉ. शेट्ये यांनी स्पष्ट केले. बिबट्या नर जातीचा व ३ ते ४ वर्षे वाढीचा होता. दोन ते तीन दिवस या बिबट्यावर उपचार केले जाणार असल्याचे डॉ. शेट्ये यांनी नमूद केले. याप्रसंगी रत्नागिरी-चिपळूण सहायक वनसंरक्षक प्रियंका लगड, रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, फिरते पथक रत्नागिरी-चिपळूणचे परिक्षेत्र वन अधिकारी जितेंद्र गुजले, देवरुखचे वनपाल सागर गोसावी, लांजा वनपाल सारिका फकीर, वनरक्षक आकाश कडूकर, सहयोग कराडे, सुप्रिया काळे, सुरज तेली, नमिता कांबळे, श्रावणी पवार, विशाल पाटील, दत्तात्रय सुर्वे, रणजीत पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. ही कार्यवाही रत्नागिरी-चिपळूण विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई तसेच रत्नागिरी-चिपळूण सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.








