उंब्रज, प्रतिनिधी
Satara News : कराड तालुक्यातील वराडे येथे बिबट्यानी धुमाकूळ घातलाय.मंगळवारी पहाटे पावने दोन वाजण्याच्या सुमारास गावात घुसलेला बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला .वराडेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन बिबट्यांचे वास्तव्य आहे. हे बिबटे महिन्याभरात अनेकदा सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आले आहेत.यामुळे वराडे गावात सध्या बिबट्याची दहशत आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घराबाहेर कसे पडायचे या चिंतेत ग्रामस्थ आहेत.वनविभागाने बिबटे पकडण्यासाठी गावात पिंजरे लावण्याची मागणी होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वराडे तालुका कराड येथील पश्चिमेच्या बाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात मंगळवारी २६ रोजी पहाटे पावने दोन वाजण्याच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात फिरत असलेला बिबट्या कैद झाला.या परिसरात तीन बिबटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.माजी सरपंच आनंदराव जाधव यांच्या पाळीव कुत्र्यासह गावातील अनेक पाळीव कुत्री बिबट्यांनी फस्त केली आहेत.अनेक महिन्यांपासून येथील डोंगर परिसरात बिबट्यांचा वावर आहे.मात्र आता बिबटे लोक वस्तीत बिनधास्त वावरू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सीसीटीव्ही कॅमेरातही अनेकदा तीन बिबटे एकत्रितपणे गावात घुसल्याचे अनेकदा दिसून आले.त्यामुळे ग्रामस्थांची पाचावर धारण बसली आहे.बिबट्या सहसा माणसांवर हल्ला करत नसला तरी लहान मुले व जनावरे सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान गावकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे.वन विभागाचे स्वतंत्र कार्यालय वराडे मात्र बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही हालचाली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून शिवारातील कामे खोळंबली आहेत.
वराडेत येथे सध्या लोकवस्ती नजीक असणाऱ्या उसाच्या शेतात बिबट्याचा वावर वाढला आहे.काही महिन्यांपूर्वी एका दुचाकी स्वरांचा बिबट्याने पाठलाग केला.तसेच एका युवकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र युवकाने आरडाओरडा केल्याने ग्रामस्थांनी धाव घेतली त्यानंतर बिबट्याने धुम ठोकली.तर ऐन गणेशोत्सवात चारच दिवसांपुर्वी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास गावात बिबट्या शिरला होता.त्यावेळी ग्रामस्थांनी आरडाओरडा केला.दरम्यान, वराडे ग्रामपंचायतीनेही या संदर्भात वनविभागाकडे पत्रव्यवहार करुन बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
वनविभागाकडून उपाययोजना नसल्याने ग्रामस्थ धास्तावले…
वराडेत गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्यानी उच्छाद मांडला आहे.मात्र वनविभागाकडून उपाययोजना नसल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत.तीन वर्षांपूर्वी वराडे येथे डोंगर पायथ्याशी बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता मात्र बिबट्याने हुलकावणी दिली.त्यानंतर बिबट्या चरेगांव,भवानवाडी,माजगांव,तळबीड,वनवासमाची या परिसरात दिसू लागला त्यामुळे वराडे येथील पिंजरा महिनाभरानंतर हलविण्यात आला.दरम्यान, मागील काही दिवसापासून पुन्हा बिबट्यांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांच्या घबराटीचे वातावरण आहे.गावात पुन्हा पिंजरे लावण्याची मागणी होत आहे.