राजापूर ,वार्ताहर
तालुक्यातील नवेदर लोणवीवाडी येथे सुगंधा सदाशिव बावकर यांच्या राहत्या घरा लगत रचून ठेवलेल्या लाकूड सामानाच्या खाली मरण पावलेला बिबट्या आज आढळून आला. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. संबंधित बिबट्याचा उपासमारीने सुमारे तीन – चार दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबत वन विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार,
तालुक्यातील लोणवीवाडी येथील सुगंधा सदाशिव बावकर यांचे राहते घराच्या भिंतीलगत रचून ठेवलेल्या लाकूड सामानाच्या खाली बिबट्याचा बछडा मृत झाल्याची माहिती पोलीस पाटीलांमार्फत राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे आणि सहकाऱ्यांना मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली असता त्याठिकाणी बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत दिसून आला. त्यानंतर त्यांनी मृत बिबट्याच्या बछड्यास ताब्यात घेवून राजापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडून तपासणी करून घेतली. सदर बिबट्याचा मृत्यू हा उपासमारीने झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बिबट्याचा मृत्यू ३ ते ४ दिवसांपूर्वी झाल्याने त्याचे शरीर कुजलेले अवस्थेत दिसून आल्याने त्याचे सहाय्यक वनसंरक्षक यांचे समक्ष जागेवर दहन करण्यात आले. यावेळी राजापूरचे वनरक्षक विक्रम कुंभार, रेस्क्यु टिमचे दिपक चव्हाण, प्रथमेश म्हादये, विजय म्हादये, गणेश गुरव, दिपक म्हादये, वसंत पाटील, नवेदरचे पोलीस पाटील भोवड आदी उपस्थित होते.
दरम्यान, आसपासच्या परिसराचा शोध घेवून अवैध बाबी काही आढळून येत आहेत का ? याचा तपास वन विभागाकडून सुरु करण्यात आला आहे. हा तपास विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांचच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे, राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे पुढील तपास करीत आहेत.