रामनगर / वार्ताहर
जोयडा तालुक्यातील जगलबेट-शिंगरगाव मार्गावर गुरुवारी सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. बिबट्याचा मृत्यू फासात अडकून झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले आहे.
शिंगरगाव मार्गावर पहाटे माकडे ओरडण्याचा आवाज आल्याने येथील स्थानिक व फॉरेस्ट कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता झाडीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. ही घटना कळताच एसीएफ के. डी नाईक, जगलबेट आरएफओ चंद्रकांत हिप्परगी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर बिबट्याच्या शवविच्छेदनासाठी पशुवैद्याधिकाऱ्यांना बोलविण्यात आले. शवविच्छेदनानंतर सदर बिबट्या फासात अडकून मृत झाल्याचे स्पष्ट झाले. बिबट्या मृत झाल्याची घटना कळताच रस्त्याशेजारी बघ्यांची गर्दी झाली होती.









