या झटापटीनंतर बिबट्याने कंपनीतून धुम ठोकली
उंब्रज : कराड येथील औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीमध्ये बिबट्या घुसल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मध्यरात्रीदरम्यान, बिबट्या कंपनीच्या आत घुसला. कंपनीमध्ये असलेल्या टायगर कुत्र्याची आणि बिबट्याची झटापट झाली. या झटापटीनंतर बिबट्याने कंपनीतून धुम ठोकली.
या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. दरम्यान, या झटपटीत टायगर कुत्र्याला किरकोळ दुखापत झाल्याचे कंपनी मालकाने सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी की, तासवडे एमआयडीसीतील कंपनीl मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गेटमधून बिबट्याने परिसरात प्रवेश केला.
कंपनी मालकाने पाळलेले टायगर कुत्र्यासोबत बिबट्याची झटापट झाली. या झटापटीनंतर बिबट्याने येथून धूम ठोकली. सकाळी कंपनी उघडल्यानंतर टायगर कुत्रे जखमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मालकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. त्यावेळी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कंपनीत बिबट्या घुसल्याचे दिसून आले.
बिबट्या आणि कुत्र्याची बराच वेळ झटापट झाल्याचे दिसून आले. तासवडे एमआयडीसीत गेल्या काही वर्षांपासून वारंवार बिबट्याचे दर्शन झाले आहे. एमआयडीसी परिसरातील डोंगर परिसरात असणाऱ्या पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकदा बिबट्या एमआयडीसीतून महामार्गापर्यंत आल्याचे दिसून आले आहे. या परिसरात बिबट्याचा राबता असून या घटनेने उद्योजक व कामगार वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.








