शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान : महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शेतकरी हतबल
बेळगाव : लेंडी नाला चार ते पाच ठिकाणी फुटल्याने सांडपाणी शिवारात शिरण्याची घटना मंगळवारी घडली. समर्थनगर, टीचर्स कॉलनी, जुने बेळगाव शिवारात लेंडी नाला अतिरिक्त पाण्यामुळे फुटला. सांडपाणी शिवारामध्ये शिरल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी वेळोवेळी विनंती करूनही लेंडी नाल्याची स्वच्छता करण्यात आली नाही. शेवटी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने ते हतबल झाले आहेत.
शहरातून वाहणाऱ्या लेंडी नाल्याची स्वच्छता करावी यासाठी बेळगाव शेतकरी संघटनेने यापूर्वी महानगरपालिका, तहसीलदार, तसेच आमदारांना निवेदन दिले होते. परंतु पावसाळा व निधीची कमतरता अशी उत्तरे देऊन नाला स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जुना धारवाड रोड येथे 30 फुटांचा नाला असताना समर्थनगरच्या पुढील भागात केवळ 6 ते 7 फूट जागेतून नाल्याचे सांडपाणी वाहत आहे. काही ठिकाणी अतिक्रमण तर काही ठिकाणी जलपर्णीचे आच्छादन असल्यामुळे सांडपाणी पुढे जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.
मंगळवारी सकाळपासून बेळगाव शहरासह उपनगरात धुवाधार पाऊस झाला. शहरात आलेले पाणी नाल्यांच्या वाटे राष्ट्रीय महामार्गाकडे वाहत गेले. परंतु लेंडी नाल्याचे पात्र कमी असल्यामुळे अतिरिक्त पाणी नाल्यावरून वाहत शिवारामध्ये शिरले. चार ते पाच ठिकाणी लेंडी नाला फुटून शिवारामध्ये सांडपाणी शिरल्याने भातपिकाचे नुकसान झाले. यामुळे शिवारात पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले.
हायवेजवळचे पाईप खुले करा
नाला अरुंद असल्यामुळे सांडपाणी जाण्यास वाट उपलब्ध नाही. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गाजवळ पाईप खुले करण्यात न आल्याने पाणी समर्थनगर, टीचर्स कॉलनी, तसेच खासबाग शिवारामध्ये साचून राहिले. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन त्वरित पाईप खुले केले असते तर मंगळवारप्रमाणे समस्या उद्भवली नसती. किमान यापुढे तरी नाल्याचे रुंदीकरण करून हायवेजवळचे पाईप खुले करावेत, अशी मागणी बेळगाव शेतकरी संघटनेने केली आहे.









