8 ते 10 रुपयाला एक, रसाळ लिंबूंची चलती
बेळगाव : दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या शरीराची लाहीलाही होऊ लागली आहे. त्यामुळे शरीराला थंडावा देण्यासाठी शीतपेयांची मागणी वाढू लागली आहे. विशेषत: बाजारात रसाळ लिंबूंची चलती पाहायला मिळत आहे. मात्र लिंबूंचा दर भरमसाट वाढला आहे. एक लिंबू 8 ते 10 रुपयांना झाला आहे. किरकोळ बाजारात लिंबू आवक वाढली आहे. त्याचबरोबर मागणीदेखील वाढत आहे. यात्रा-जत्रा आणि लग्नसराईला सुरुवात झाली आहे. वाढत्या दराचा फटका सहन करावा लागत आहे. हुबळी, विजापूर, सांगली येथून लिंबू दाखल होऊ लागले आहेत. 400 ते 600 रुपये शेकडा याप्रमाणे लिंबूंची विक्री होऊ लागली आहे. दरवर्षी उन्हाळा वाढला की, लिंबूंची आवक वाढते. त्याचबरोबर मागणीदेखील वाढत जाते. वाढत्या उष्म्याबरोबर थंड पेयांना पसंती दिली जात आहे. लिंबू सरबत, लिंबू सोडा यासाठी लिंबूंची खरेदी होऊ लागली आहे. कोल्ड्रिंक्स, रसवंती गृहे आणि लिंबू सरबत तयार करण्यासाठी लिंबूंची विक्री वाढली आहे.









