जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : तयारीची सूचना
बेळगाव : राज्य सरकारचे हिवाळी विधिमंडळ अधिवेशन येत्या डिसेंबरमध्ये बेळगाव येथील सुवर्णविधानसौध येथे भरविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक तयारी करण्याची सूचना सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. दि. 4 डिसेंबरपासून अधिवेशनाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. लेखी आदेश आलेला नाही. त्यामुळे अधिवेशनाच्या तयारीची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी बैठक झाली. अधिकारी व हॉटेल मालक यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी बोलत होते. अधिवेशनासाठी येणाऱ्या मान्यवरांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली आहे. त्यादृष्टिने वसती समिती, आहार समिती, आवश्यक वस्तू खरेदी आणि मुद्रण समिती, परिवहन आणि इंधन समिती, आरोग्य समिती, पास वितरण समिती, तक्रार निवारण समितींची रचना करण्यात आली. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही समितीची रचना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
नियोजित केलेल्या समितीनुसार पूर्वतयारी बैठक घेऊन तयारी करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. अधिवेशनासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी, माध्यम प्रतिनिधी यांची राहण्याची व्यवस्था करण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली. यासाठी डिसेंबर महिन्याला सुरुवात झाल्यानंतर कोणत्याही हॉटेल मालकांनी इतरांसाठी खोल्या आरक्षित करू नयेत, असे त्यांनी सांगितले. डिसेंबर 4 तारखेपासून अधिवेशनाला सुरुवात होण्याची शक्यता असून अद्याप लेखी स्वरुपात तारीख निश्चित करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. नोव्हेंबर 6 नंतर याबाबत स्पष्टीकरण मिळणार आहे. शेवटच्या क्षणी तारखेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. मागीलवेळी हॉटेल व्यावसायिकांची बिले वेळेत देण्यात आली आहेत. त्याप्रमाणेच यावेळीही हॉटेल बिले वेळेत देण्यात येतील. अधिवेशनाला येणाऱ्यांसाठी योग्यप्रकारे सोय करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडावी व सहकार्य करावे, असे पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी सांगितले. अधिवेशनकाळात योग्य पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी जि. पं. कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, प्रशिक्षणार्थी अधिकारी शुभम शुक्ला आदी उपस्थित होते.









